‘वाळवी’ मध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण...

‘वाळवी’ मध्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्य (Marathi Thriller ‘Vaalvi’ Has A Hair Raising Strong Suspense Content)

अनिकेत आणि अवनी या निपुत्रिक जोडप्याच्या संसारात आता काही राम राहिलेला नाही. अवनीची मानसोपचार तज्ज्ञाकडे ट्रिटमेंट चालू आहे. अन्‌ अनिकेत व्यवसायात कर्जबाजारी झाला आहे. त्याच्या घरावर जप्ती आली आहे. म्हणून दोघेही आत्महत्या करायचे ठरवतात… मात्र ही योजना म्हणजे अवनीला मारण्याचा कट असतो, जो अनिकेत आणि त्याची डॉक्टर मैत्रिण देविका खुबीने रचतात…

‘वाळवी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रहस्यमय चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथानकाची रुपरेषा लक्षात येते, ती वरीलप्रमाणे. प्रत्यक्ष चित्रपटामध्ये अनिकेत-देविका यांच्या या कुटिल कारस्थानाला एकामागोमाग एक असे काही सुरुंग लागतात की चित्रपटातील पात्रांप्रमाणेच प्रेक्षक देखील कमालीचे अचंबित होतात. ठरल्याप्रमाणे काहीच घडत नाही, जे घडतं ते धक्कादायक, विलक्षण…

कथा-पटकथा-संवाद लेखक परेश मोकाशी आणि मधुगंधा कुळकर्णी यांनी ‘वाळवी’चा प्रवास कमालीचा उत्कंठा वाढवेल असा आणि एकापाठोपाठ एक धक्के देणारा सादर केला आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आपलं हे अपत्य विलक्षण ताकदीने रुपेरी पडद्यावर सादर केलं आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया त्यांनी प्रभावीपणे साधली आहे. मराठी चित्रपटात येणारे विभिन्न विषय मराठी प्रेक्षकांप्रमाणेच बॉलिवूड चित्रकर्त्यांच्या प्रशंसेस पात्र ठरले आहेत. त्याची प्रचिती देणारा हा ‘वाळवी’ आहे.

उत्कृष्ट सादरीकरण, नेटके संकलन, पुणेरी टच्‌ लाभलेले पट्टदिशी हसू आणतील असे संवाद आणि उत्कृष्ट पात्र निवड यांनी नटलेला ‘वाळवी’ अवश्य पाहावा असा चित्रपट आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशा चार प्रमुख पात्रांभोवती फिरणाऱ्या या रहस्यकथेची चौघांच्याही अभिनयाने रंगत वाढली आहे. झी स्टुडिओज्‌ने निर्मितीमध्ये पुढाकार घेतल्याने त्यांच्या संग्रहात उत्कृष्ट चित्रपटाची भर पडलेली आहे.