अभिनेता प्रशांत दामले करणार नाटकाचा १२,५०० वा प...

अभिनेता प्रशांत दामले करणार नाटकाचा १२,५०० वा प्रयोग : नाटकवाल्याचा अभूतपूर्व विक्रम (Marathi Stage Actor To Perform His 12500th Show : Creating A World Record)

येत्या ६ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका जागतिक विक्रमाची नोंद होणार आहे. गुणी अभिनेता प्रशांत दामले, त्याच्या नाट्यजीवनातील १२ हजार ५०० वा प्रयोग मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये करणार आहे. एका कलाकाराने नाटकाचे इतके प्रयोग करणारा प्रशांत दामले हा बहुधा जगातील एकमेव कलाकार ठरणार आहे.

गेल्या ३ दशकांपासून प्रशांत दामले नाटकातून विविध भूमिका साकार करीत आहे. विशेष म्हणजे या १२ हजारांहून अधिक प्रयोगात त्याने अधिकतर विनोदी भूमिका साकार केल्या आहेत.

‘टूरटूर’ या नाटकाद्वारे प्रशांत दामलेने व्यावसायिक नाटकातून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर मोरूची मावशी आणि गेला माधव कुणीकडे ही त्याने भूमिका केलेली नाटके इतकी गाजली की, मोरुची मावशीचे हजारभर तर गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या १८२२ प्रयोगातून प्रशांतने भूमिका रंगविल्या. त्यानंतर संशयकल्लोळ मधील फाल्गुनराव, लेकुरे उदंड जाली मधील राजा याही भूमिका त्याच्या खूपच गाजल्या. ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार या पुनरुज्जिवित नाटकांचे त्याने अनेक प्रयोग केले. प्रियतमा, एका लग्नाची गोष्ट, चार दिवस प्रेमाचे ही देखील नाटके त्याने केली.

एक काळ असा होता की, प्रशांतची भूमिका असलेले एक तरी नाटक दररोज होत असे. एकाच दिवशी कधी एक तर कधी दोन प्रयोग करण्याचा उत्साह त्याच्या अंगी होता. तशातच १८ जानेवारी २००१ या दिवशी प्रशांतने एकाच दिवशी ५ प्रयोग करण्याचा अनोखा विक्रम केला. अन्‌ तो ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चेचा, कौतुकाचा विषय झाला. आपल्या ३ नाटकांचे एकाच दिवशी, सकाळपासून रात्रीपर्यंत ५ प्रयोग करून त्याने जागतिक रंगभूमीवर विक्रम नोंदविला. तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

वय झाल्यानंतर आपण तरुण नायकाच्या भूमिका करू शकत नाही. त्या शोभणार नाहीत, याची जाणीव ठेवून प्रशांत दामलेने कार्टी काळजात घुसली या नाटकात तरुण मुलीच्या वडिलांची भूमिका केली. त्यानंतर एका लग्नाची पुढची गोष्ट, साखर खाल्लेला माणूस, सारखं काहीतरी होतंय्‌ या नाटकातून त्याने चरित्र भूमिका केल्या व अजूनही करतोय्‌.

हा अवखळ, उत्साही, मिश्कील अभिनेता पुढे निर्माता झाला. तसेच बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना नाटकापर्यंत आणण्यासाठी त्याने देशात पहिल्यांदाच नाटकाच्या तिकिटांचे ऑनलाईन बुकींग सुरू केले. हे त्याचे मराठी रंगभूमीसाठी मोठे योगदान आहे.

‘रंगदेवतेची सेवा याची माझी व्याख्या आहे – तीन तास तुम्ही जे सादर करता, ते चोखपणे करा. म्हणजे मग रंगदेवता आणि प्रेक्षकही तुम्हाला पुन्हा रंगमंचावर उभं राहायची संधी देतात. सादरीकरण करताना स्वच्छ मनानं आणि प्रामाणिकपणे करा’, हे प्रशांत दामलेचे आपल्या अभिनय कलेबाबत मनोगत आहे.

हजारो प्रयोग करणाऱ्या या प्रेक्षकप्रिय नटसम्राटाला आमचा सलाम.