मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा ! (Marathi Bhasha ...

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा ! (Marathi Bhasha Din)

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय २१ जानेवारी इ.स.२०१३ रोजी घेण्यात आला. भावी पिढीने मराठीचा, आपल्या मातृभाषेचा वारसा पुढे नेटाने चालवावा आणि मराठी भाषेचे शाश्वतपण टिकवावे या हेतूने जगभरात जेथे मराठी माणूस राहतो तेथे हा मराठी भाषा दिन साजरा होतो.

आज खरंतर ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी आपली मराठी भाषा कालौघात बलवत्तरतेकडून कमकुवततेकडे वळलेली दिसते. या सगळ्याला आपण मराठी माणूसच जबाबदार आहोत, ही चिंतनीय बाब आहे. आज मराठी माणूस जगभर पोचला आहे, परंतु मराठी भाषा मात्र पोचली नाही. तेव्हा जागतिकीकरणात मराठी भाषा ताठ मानेने उभी राहील, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनच कशाला आपण सर्व मराठी माणसाने अभिमानाने आपल्या भाषेचा मान राखायला पाहिजे. केवळ एका दिवशी आपल्या भाषेचे महत्त्व गौरविले जाऊ नये.

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र

मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!