मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर आय...

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर आयफा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित (Marathi Actress Saie Tamhankar Wins Best Supporting Actress At Iifa Awards)

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकरला तिच्या हिंदी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. ‘मिमी’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सन्मानित करण्यात आलं आहे. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या ती आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. ती नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असते.

यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यामध्ये सईला मिळालेला पुरस्कार हा मराठी सिनेसृष्टीच्या प्रत्येक कलाकारासाठी तसेच प्रेक्षकांसाठीही आनंद देणारा आहे. (Saie tamhankar wins best supporting actress at iifa awards)

https://www.instagram.com/p/CeZY5SXMQI8/

दरम्यान ‘मिमी’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारात एका सरोगेट मदरची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी तिला विचारण्यात येते. यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते, यानंतर पुढे काय काय होते, यावर ही कथा अवलंबून आहे.

यात सई ताम्हणकर हिने क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते. मागच्या वर्षी हा कॉमेडी आणि ड्रामा असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)