अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात ( Marathi...

अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात ( Marathi Actress Neha Joshi Married With Omkar Kulkarni )

हिंदी कलाकरांप्रमाणेच मराठी कलाकारांची लग्नं सुद्धा चर्चेत असतात. सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत देखील लग्नाचा हंगाम सुरु आहे असे म्हटल्यास हरकत नाही. मागील एक-दोन महिन्यांत विराजस कुलकर्णी- शिवानी रांगोळे, ह्रता दुर्गुळे- प्रतिक शहा, सुयश टिळक- आयुषी भावे, सोनाली कुलकर्णी इत्यादी कलाकार विवाहबंधनात अडकले. तर सर्वांची लाडकी पाठक बाई आणि राणादाची जोडी सुद्धा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजले. या दोघांचा साखरपुडा मे महिन्यात झाला होता. या दोघांच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत आहेत.


या सर्वांमध्ये आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप लग्न केले आहे. अभिनेत्री नेहा जोशी आणि ओंकार कुलकर्णी हे दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. नेहाने फायनली मॅरिड असे म्हणत सोशल मीडियावरुन आपले लग्न झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. नेहा आणि ओंकारने अगदी साध्या पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले.

नेहा आणि ओंकार गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. या दोघांनी एकत्रित कामही केले आहे. ओंकार कुलकर्णी हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. काही नाटक आणि शॉर्टफिल्मचे त्याने लेखन केले आहे. Knock knock सेलिब्रिटी या नाटकामुळे नेहा आणि ओंकार यांची ओळख झाली. या नाटकात नेहाची प्रमुख भूमिका होती.


या व्यतिरिक्त नेहाने वेगवेगळ्या मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऊन पाऊस या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर का रे दुरावा या मालिकेतील रजनी या पात्राने तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

न्यूड, नशीबवान, पोश्टर बॉईज, नाती, पोश्टर गर्ल, ड्रीम मॉल, लालबागची राणी, स्वप्न तुझे नी माझे, फर्जंद अशा चित्रपटांमधून नेहाने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.एक महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या हिंदी मालिकेतून नेहाने भीमाबाईंची व्यक्तिरेखा साकारली होती.