अभिनेत्री अमृता देशमुखला मिळाला पुण्याच्या टॉकर...

अभिनेत्री अमृता देशमुखला मिळाला पुण्याच्या टॉकरवडीचा मान… रेडिओ जॉकी म्हणून सुरू केले काम (Marathi Actress Amruta Deshmukh Starting Her Job As Radio Jokey Punyachi Talkerwadi)

मराठी कलाकारही नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आपली छाप पाडत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक कलाकारांनी स्वतःचे व्यवसाय देखील सुरु केले आहेत. काहींनी हॉटेल व्यवसायात पाय रोवलेत तर कुणी वस्त्रोद्योग थाटला आहे. अशातच अभिनेत्री अमृता देशमुख हिने नवी संधी मिळवली आहे.

कलाकारांना आवाजाचे वरदान लाभलेले असते. प्रत्येक कलाकाराला त्याचा स्वातंत्र आवाज असतो, ज्यावरून पुढे त्यांची ओळख निर्माण होते. अशी संधी अमृता देशमुख हिने मिळवली आहे. रेडिओ जॉकी म्हणून तिने आपले नवे काम सुरु केले आहे. रेडिओ 98.3 मिर्ची या मराठी एफएम वर तिचा आवाज ऐकू येणार आहे. ‘पुण्याची टॉकरवडी’ असे तिच्या शो चे नाव असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देणारे काही व्हिडिओज अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ‘उठा उठा सकाळ झाली. अमृताच्या मॉर्निंग शो ची वेळ झाली. मी अमृता देशमुख मिर्ची ची ब्रँड न्यू होस्ट. मला आतापर्यंत तुम्ही फ्रेशर्स मधली परी किंवा स्वीटी सातारकरमधली स्वीटी म्हणून पाहिलं असेल पण एक सांगू का खऱ्या आयुष्यात ना मी कुणाची परी आहे ना मला स्वीटी म्हणावं एवढी मी स्वीट आहे. मला वाटतं मी जरा नमकीन आहे अगदी बाकरवडी सारखी आणि म्हणूनच माझं नाव आहे टॉकरवडी.’ असे म्हणत अमृता रेडिओ जॉकी बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

स्वीटी सातारकर, आज्जी आणि नात, मी तुझीच रे, एक कुटुंब तीन मिनार, देवाशप्पथ, कलाकार, बाबुरावला पकडा या चित्रपट आणि मालिकांमधून अमृता देशमुखने आजवर अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत तिने साकारलेली परीची भूमिका घरघरात पोहचली. अभिनयासोबतच तिला डान्सची देखील आवड आहे. आता तिच्या या नव्या कामालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.