दहीहंडी उत्सवात मराठी कलाकारांची हजेरी : ५० हजा...

दहीहंडी उत्सवात मराठी कलाकारांची हजेरी : ५० हजार ते लाखो रुपयांचे मानधन घेणार (Marathi Actors Celebrate Dahi Handi Festival: Charging Rs. 50,000 To Lakhs of Rupees For Participation)

दोन वर्षानंतर यंदाचा दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा करण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्बंध उठविल्याने व या खेळास साहसी खेळाचा दर्जा जाहीर केल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे.

या दहीहंडीसाठी मराठी चित्रपट व मालिकांच्या नामांकित कलाकारांना आमंत्रित केले जाते.  मुंबई, ठाणे व पुणे येथे दहीहंडी या कलाकारांच्या उपस्थितीने रंगणार आहे.

आज ‘ दगडी चाळ 2’ व ‘बॉईज ३’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्यांच्या प्रचाराची संधी साधत या चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे.

प्रथमेश परब, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अनिता दाते, पल्लवी पाटील, धनश्री कडगांवकर, प्रार्थना बेहेरे इत्यादी कलावंत दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.

दहीहंडी व इतर उत्सव तसेच निवडणुकीच्या काळात उमेदवार आपल्या प्रचारासाठी चित्रपट व मालिका यातील नामांकित कलाकारांना सामील करून घेतात. मात्र त्यासाठी हे कलाकार मानधन आकारतात.

हे मानधन 50 हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असते. कलाकार या मानधनास ‘सुपारी’ घेणे असे बोलतात. मराठी कलाकारांची ही वरकमाई त्यांना आनंदित करत असते.