बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला विशाल...

बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला विशाल निकम! (Marathi Actor Vishal Nikam Wins The Bigg Boss Marathi Season 3 title)

‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता, महाराष्ट्राला ‘बिग बॉस’ मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला. सांगलीचा रांगडा गडी विशाल निकम (Vishal Nikam) हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे सुरुवातीपासूनच विशाल चर्चेत राहिला.

 ‘ग्रँड फिनाले’च्या या शर्यतीत मीरा जगन्नाथला बाहेर काढल्यानंतर या शोला अखेर त्यांचे ‘टॉप ५’ फायनलिस्ट मिळाले होते. या पाच स्पर्धकांतून मिनल शहा आणि उत्कर्ष शिंदे यांची एक्झिट झाली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. या तिघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. यातील विकास पाटील हा स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर स्प्लिट्सव्हिलाचा विजेता जय दुधाणे आणि विशाल यांच्यात शेवटचा सामना झाला होता. मात्र जनतेच्या अधिक मतांमुळे विशालने जयला हरवत या पर्वाचे विजेतेपद पटकावले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.

विजेत्याची घोषणा करण्यापूर्वी, निर्मात्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि सगळ्यांनी विशाल निकम याचे तोंडभरुन कौतुक केले. महेश मांजरेकर म्हणाले की, हा सीझन खूप यशस्वी झाला आहे आणि ते लवकरच या शोचा सीझन ४ घेऊन येणार आहेत. कर्करोगावर विजय मिळवल्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या महेश मांजरेकर यांचेही सर्वांनी कौतुक केले. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.

Vishal Nikam
Vishal Nikam

सध्या सोशल मीडियावर विशालवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून विशालने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळचा सांगलीकर असणाऱ्या विशालला लहानपणापासूनच अभिनयाचं वेड होतं. वडील शेतकरी, घरात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. अश्या परिस्थितीतही विशालने आपला हट्ट सोडला नाही. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत त्याने मुंबई गाठली. अभिनय क्षेत्रात पाऊल कसं टाकावं याची माहिती मिळवण्यासाठी त्याने मुंबईतल्या एका जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली.

Vishal Nikam

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेतून विशाल प्रसिद्धीझोतात आला. विशालने ‘मिथुन’ आणि ‘धुमस’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच डान्स, मार्शल आर्ट्स आणि तलवार बाजीचंही विशालने प्रशिक्षण घेतलं आहे. क्रिकेटमध्येही विशाल पारंगत आहे. विशालच्या जिद्दीचा हा प्रवास तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.