नाटक… सिनेमा… मालिका अशी तिन्ही क्ष...

नाटक… सिनेमा… मालिका अशी तिन्ही क्षेत्रे गाजविलेला विनोदी अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे निधन (Marathi Actor Pradeep Patwardhan Passed Away)

मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे प्रदीप पटवर्धन यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले होते. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले होते. चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख कमावलेले पटवर्धन त्यानंतर व्यावसायिक नाटकाकडे वळले. अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. त्यांचे अनेक चित्रपट आणि मालिका आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यासोबतच होल्डिंग बॅक (२०१५), मेनका उर्वशी (२०१९), थँक यू विठ्ठला (२००७), 1234 (२०१६) आणि पोलीस लाईन एक पूर्ण सत्य (२०१६) यासारख्या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.

मराठी रंगभूमीवर अनेक दशके हाऊसफुल्लचा बोर्ड मिरवणाऱ्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातली पटवर्धन यांची भूमिकाही खूप गाजली होती. या नाटकाचे तब्बल दीड हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले. केवळ विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. प्रदीप पटवर्धन हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते. त्यामागील कारण त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.