बुर्ज खलिफावर झळकला मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठ...

बुर्ज खलिफावर झळकला मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे (Marathi Actor Adinath Kothare 83 Movie Trailer On Burj Khalifa )

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित ८३ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर दाखवण्यात आला. त्यामुळे या टीमचे कौतुक केले जात आहे.

कबीर खान दिग्दर्शित ८३ चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसकर ह्यांच्या भूमिकेत आदिनाथ आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसणार आहे. आदिनाथ कोठारे हा बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. याबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला, “मी फार भावूक झालो आहे. जगातील सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा दिसणं ही कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.”

‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटूंबाला–चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे, असेही आदिनाथ म्हणाला.

हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

२०२१ हे वर्ष आदिनाथ कोठारेसाठी करिअरच्या दृष्टीने अविस्मरणीयच ठरलं असं म्हणावं लागेल. कारण यंदा आदिनाथला ‘पाणी’ चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याचवर्षी आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजद्वारे पदार्पण करत आपला वेगळा ठसा उमटवला.

आदिनाथने ‘माझा छकुला’ या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात एका बालकलाकाराच्या भूमिकेत तो झळकला होता. त्यानंतर त्याने त्याचे वडील महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. झपाटलेला २, सतरंगी रे यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम