मंगळसूत्र चोरीला गेलं आहे (Mangalsutra Is Stolen)

मंगळसूत्र चोरीला गेलं आहे (Mangalsutra Is Stolen)

आमच्या घरी लग्नकार्य होतं. त्यासाठी मी नवीन डिझाईनचं मंगळसूत्र बनविलं होतं. ते घालून मी लग्नात दिवसभर मिरविले. परंतु घरी परत जाण्याच्या वेळेस काय उपरती झाली, अन् मी ते काढून बॅगेत ठेवलं आणि जुनं मंगळसूत्र घातलं. नंतर इकडे-तिकडे फिरले. अन् घरी जाऊन, ते मंगळसूत्र कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवण्याच्या उद्देशाने पाहिले, तर ते गायब झाले होेते. मला खूपच धक्का बसला. मी बॅगेतील सामान उलटसुलट करून पाहिले, तरी पण त्या मंगळसूत्राची पेटी मला मिळालीच नाही. अशी ती गहाळ होण्याजोगी वस्तू नाही. त्यामुळे ते नक्कीच चोरीला गेलं असावं, अशी माझी व मिस्टरांची खात्री पटली. अन् मी धाय मोकलून रडले… मग साहजिकच मंगळसूत्र कोणी चोरलं असावं, याबद्दल घरातल्या लोकांचे तर्क सुरू झाले. ज्या खोलीत मी बॅग ठेवली होती, तिथे कोण आलं-गेलं, याबद्दल मलाच प्रश्‍न विचारले गेले. लग्नाच्या हॉलवर आपल्याला जी खोली दिलेली असते, तिथे जवळच्या नातेवाइकांशिवाय कोणी येत-जात नसतं. हे लक्षात घेता, मला माझ्या जाऊबाईचा दाट संशय येतो आहे. त्या परिस्थितीनं गरीब व स्वभावानं हावरट आहेत. यापूर्वी त्या जेव्हा जेव्हा आमच्या घरी आल्या होत्या, तेव्हा रुमाल, घड्याळ, लिपस्टीक अशा काही ना काही वस्तू गायब झालेल्या होत्या. तेव्हा माझा जाऊवर संशय आहे. पण तिला डायरेक्ट विचारणार कसे, हा प्रश्‍न आहे, अन् माझी महागाची वस्तू, तेही सौभाग्यलेणं गेलं म्हणून मी अतिशय अस्वस्थ आहे.

मंगळसूत्र म्हणजे सौभाग्यलेणं असतं. त्याबद्दल महिला अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे ते हरवणं किंवा चोरीला जाणं, अशी घटना घडली तर अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. तुमच्या बाबतीत चोरीचा मामला जवळच्या नातेवाईकाशी निगडीत आहे. त्यांनीच मंगळसूत्र चोरलं असल्याची तुमची खात्री पटली असली तरी, त्यांना विचारायचं कसं, हा तुमच्यासमोर पेच आहे. तुमचा संकोच समजण्याजोगा आहे. कारण ती बाई सहजासहजी कबूल तर करणार नाहीच. पण घरात भांडणे लावून देण्याची शक्यता आहे. त्या तुमच्या धाकट्या जाऊ आहेत की मोठ्या, ते स्पष्ट केलेलं नाही. परंतु मोठ्या असाव्यात, म्हणूूनच तुम्हाला त्यांना थेट विचारणं अवघड झालं असावं. मोठ्या असो की लहान, हे अवघड जागी दुखणं आहे, हे निश्‍चित. परंतु खुडत राहण्यापेक्षा अन् अस्वस्थ मनानं दिवस काढण्यापेक्षा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावणं इष्ट आहे. एकतर सौभाग्यलेणं, तेही नवीन केलेलं म्हणजे खर्च बराच झाला असणार. सोन्याचे भाव आजकाल केवढे तरी वाढले आहेत. तेव्हा आपल्याला माहीत असूनदेखील गप्प राहणं, शहाणपणाचं नाही. त्यामुळे जाऊबाईंना डायरेक्ट विचारण्यात अडचण येत असेल, तर मी देवाचा कौल मागितला, अन् त्यातून तुमचे नाव पुढे आले आहे; असे त्यांना सांगा. देवाला मधे घातलंत तर त्या काही बोलू शकणार नाहीत. देवाची भीती घातली तर कदाचित त्या कबूल होतील व मंगळसूत्र परत देतील. तेव्हा हा प्रयोग करून पाहा व आपली अस्वस्थता दूर करा.