अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदय...

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Mandira Bedi’s husband Raj Kaushal dies of heart attack)

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. ३० जून रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केलंय.

अभिनेत्री आणि निवेदिका मंदिरा बेदी आणि दिग्दर्शक राज कौशल यांनी १४ फेब्रुवारी १९९९ साली लग्नगाठ बांधली होती. १९९६ साली ‘फिलिप्स-10’ या टेलिव्हिजनवरील एका शो दरम्यान त्यांची भेट झाली. त्यावेळेस राज कौशल, मुकुल आनंद यांचे चीफ असिस्टंट होते आणि या शोसाठी ते ऑडिशन घेत होते. या ऑडिशनसाठी मंदिरा बेदी आली होती. त्यावेळेस मंदिराने ‘शान्ति’ या टेलिव्हिजनवरील मालिकेत आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यासारख्या चित्रपटात अभिनय करून चित्रसृष्टीमध्ये स्वतःची ओळख बनवली होती. या भेटीनंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही १९९९ साली भारतीय रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले.

लग्नाला १२ वर्षे झाल्यानंतर राज आणि मंदिराने, आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. २०११ ला त्यांना मुलगा झाला, ज्याचं नाव वीर आहे. तर राज कौशल यांनी २०२० साली एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचं नाव त्यांनी तारा असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर आपल्या आनंदी कुटुंबाचा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली होती.

राज कौशल यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. २७ जूनला राज आणि मंदिराने त्यांच्या मित्र परिवारासोबत वेळ घालवत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.