मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या प्रेमकहाणीचा प...

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या प्रेमकहाणीचा पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंतचा प्रवास (Mandira Bedi And Raj Kaushal, Know Interesting Love Story Of The Couple)

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि दिग्दर्शक, निर्माता राज कौशल यांचे आज, बुधवारी पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राज कौशल ४९ वर्षांचे होते. राज यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिरा तुटून गेली आहे. त्यांच्या पश्चात अभिनेत्री मंदिरा बेदी, वीर आणि तारा ही दोन मुले आहेत. १९९९ साली त्यांचे लग्न झाले. तेव्हापासून आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या वैवाहिक जीवनात या दोघांमध्ये अतिशय चांगले बॉन्डींग होते. दोघांचे स्वभाव विरुद्ध असले तरीही दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय रंजक आहे. त्यांच्या या प्रवासाचा किस्सा जाणून घेऊया.

ऑडिशन दरम्यान भेटले मंदिरा आणि राज

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटामध्ये मंदिरा बेदीला राज नाही मिळाला, परंतु खऱ्या जीवनात तिला राज मिळाला. राजशी झालेली भेट हा सुंदर योगायोग होता. १९९६ साली ‘फिलिप्स-10’ या टेलिव्हिजनवरील एका शो दरम्यान त्यांची भेट झाली. त्यावेळेस राज कौशल, मुकुल आनंद यांचे चीफ असिस्टंट होते आणि या शोसाठी ते ऑडिशन घेत होते. या ऑडिशनसाठी मंदिरा बेदी आली होती. या आधी मंदिराने ‘शान्ति’ या टेलिव्हिजनवरील मालिकेत आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यासारख्या चित्रपटात अभिनय केलेला होता आणि राजने तिचं काम पाहिलं होतं. ही त्यांची पहिलीच भेट होती. अर्थात ही भेट कामानिमित्त झाली होती, त्यामुळे या भेटीत दोघांनी एकमेकांना नीट पाहिलं देखील नव्हतं.

तीन भेटींतच लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी बनलो आहोत

पहिल्या भेटीनंतर दोघं वरचेवर भेटू लागले. बरेचदा ते मुकुल आनंद यांच्या घरीच भेटत. १९९६ साल संपता संपता त्यांना त्यांच्यातील नात्यात मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी आहे याची जाणीव झाली. दोघंही त्यांच्यातील नात्याबाबत गंभीर होते. त्यांच्यातील तिसऱ्या भेटीतच राजला, मंदिरा आवडू लागली होती, अन्‌ मंदिराला याची पुसटशीही कल्पना नव्हती. एका मुलाखतीमध्ये तो म्हणालाही होता, ”मंदिराच माझं खरं प्रेम आहे, याची जाणीव मला तीन भेटीतच झाली. मला माझ्या जीवनातील खरं प्रेम मिळालं असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं.”

राजने लग्न करण्याचं आधीच ठरवलं होतं

ज्यादिवशी राजला कळलं की तो मंदिराच्या प्रेमात पडला आहे, त्या दिवशीच तिच्याशी लग्न करण्याचा विचार त्याच्या मनात आला होता. अन्‌ लवकरात लवकर तो तिच्याशी लग्न करु इच्छित होता. त्यामुळे लगेचच तो मंदिराला आपल्या घरी आई-वडिलांशी भेट करून द्यायला घेऊन गेला. राजच्या आई-वडिलांनी बिनाहरकत लगेच त्यांच्या लग्नास संमती दिली, परंतु मंदिराच्या घरातून संमती मिळणं जरा कठीण होतं.

मंदिराच्या आई-वडिलांना राजी करणं सोपं नव्हतं

राजच्या घरातल्यांनी लग्नासाठी परवानगी दिली, परंतु मंदिराच्या आई-वडिलांना जावई चित्रपट दिग्दर्शक नको होता. अनेक कारणांनी त्यांच्या मनात भीती होती. राजने आपल्या मुलाखतीत सांगितलं होतं, ” मी मंदिराच्या आई-वडिलांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ते थोडे नाखुष होते, पण नंतर तयार झाले. त्यांच्याकडे काही पर्यायच नव्हता.”

व्हॅलेंटाइन डेला घेतले सात फेरे

तीन वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर शेवटी १९९९ साली दोघांनी भारतीय रितीरिवाजाने लग्न केले. लग्नासाठी त्यांनी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन दिवस निवडला आणि लग्न झालं. दोघांनी २१ वर्षं सुखाने संसार केला.

एकमेकांचा प्रामाणिकपणा दोघांना पसंत होता

मंदिरा आणि राज यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तींना या दोघांकडे पाहिलं की कमाल वाटायची. म्हणजे दोघांचे स्वभाव परस्पर विरुद्ध असूनही हे दोघे इतके चांगले कसे राहू शकतात, असं सर्वांना वाटायचं. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना मंदिरा बोलायची, ”राज अतिशय प्रामाणिक आणि खरा माणूस आहे. त्याच्यात जराही खोटेपणा नाही. तो इतर लोकांसारखा सत्य लपवण्यासाठी मुखवटे घालून फिरत नाही.” राजही मग आपल्या बायकोची प्रशंसा करत म्हणायचा, ”मंदिरा एक संस्कारी, बुद्दिमान आणि सुंदर मुलगी आहे. तिने आमच्या वाईट काळातही मला साथ दिली.”

युवराज सिंहसोबत मंदिराचं नाव जोडलं गेलं

राजचा मंदिरावर खूप विश्वास होता आणि कदाचित हाच त्यांच्यातील नात्याचा महत्त्वाचा दुवा होता. पुढे मंदिरा आणि क्रिकेटर युवराज सिंह यांच्यातील अफेअरच्या वर्तमानपत्रांतून चर्चा होत असताना देखील याच भरवशामुळे त्यांच्यातील नात्याला तडा गेला नाही. २००३ सालच्या वर्ल्ड कप दरम्यान मंदिरा आणि युवराज सिंहमधील अफेअरच्या खूप चर्चा झाल्या. त्यावेळेस राजलाही याबाबत प्रश्न विचारला गेला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना राज म्हणाला होता, ”मला माझ्या लग्नावर पूर्ण विश्वास आहे. मंदिरा आणि मी अशा क्षेत्राशी निगडीत आहोत, जेथे भरवसा अधिक महत्त्वाचा असतो.”