‘मला भयंकर मानसिक त्रास दिला, बदफैली ठरवल...

‘मला भयंकर मानसिक त्रास दिला, बदफैली ठरवलं, नटमंडळी रात्री ३ वाजता दार वाजवत’- मल्लिका शेरावतने बॉलिवूडचा केला पंचनामा (Mallika Sherawat slams bollywood, Reveals- I was mentally tortured, Actors use to Knock my door at 3 in the night)

‘आरके/आरके’ या येऊ घातलेल्या चित्रपटामुळे मल्लिका शेरावत पुन्हा प्रकाशात आली आहे. तिची भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तो प्रदर्शित होण्याआधीच मल्लिकाने बॉलिवूडची काळीकुट्ट बाजू दाखवत, आपला राग व्यक्त केला आहे. बॉलिवूडच्या एका गटावर तिने भयंकर मानसिक छळ केल्याचा आरोप लावला आहे.

मला त्रास दिला, बदफैली ठरवलं गेलं

बॉलिवूड मधील आपल्या वाटचालीबद्दल मल्लिका सांगते, “हरियाणाच्या एका छोट्या शहरातून मी आले होते. मर्डर, इंटरनॅशनल अभिनेता जॅकी शॅन बरोबर चित्रपट, कान्स महोत्सवात सहभाग, बराक ओबामा यांच्याशी दोनदा भेट, अशा बऱ्याच गोष्टी बॉलिवूडने मला मिळवून दिल्या… लहान शहरातून आलेल्या मुलीला अशा संधी कुठून मिळणार होत्या… पण या वाटचालीत मला अशीही वाईट माणसे भेटली, ज्यांनी मला अपमानित केलं. मेंटल टॉर्चर केलं. छळ केला. माझी अशी इमेज बनविली की, लोकांना वाटू लागलं की मी चरित्रहीन आहे. मला बदफैली ठरवलं गेलं. पण आता हीच माणसे एक्सपोज झालीत, याचा मला आनंद आहे.”

लोक म्हणाले, मी भारतीय संस्कृती बदनाम करते आहे.

मल्लिकाने दीपिका पादुकोणच्या ‘गहराइयां’ या चित्रपटावर टीका केली. ‘‘दीपिकाचा गहराइयां हा चित्रपट मर्डर पेक्षा कमी बोल्ड आहे का? पण लोकांना हा चित्रपट दर्जेदार आणि प्रणयरम्य वाटतो. पण माझ्या चित्रपटाकडे तिरप्या नजरेनं पाहिलं जातं. माझ्या बिकिनी घालून केलेल्या दृश्यांबद्दल नको ते बोललं गेलं. मला दर्जा नाही. मी भारतीय संस्कृती बदनाम केली, असं म्हटलं गेलं.’’

पुरुषांची मक्तेदारी असलेली ही फिल्म इंडस्ट्री आहे, असं सांगून मल्लिका बोलली, “आज माझ्याकडे बिग बजेट चित्रपट नाही. कारण मी कोणत्याही मोठ्या नटाशी तडजोड केली नाही. इंडस्ट्रीत असं काही घडत नाही, असा जर एखाद्या नटीचा दावा असेल, तर ती खोटं बोलतेय्‌, असं समजा. एका ए ग्रेड नटाने, रात्री ३ वाजता माझ्या खोलीचं दार वाजवलं होतं, ते मी कधीच विसरू शकत नाही. पण मी काही तरी सबब सांगून दार उघडलंच नाही. या इंडस्ट्रीत अशा गोष्टी घडतातच.”

मल्लिका शेरावत बऱ्याच वर्षांनी चित्रपटात येते आहे. आपल्या आरके/आरके या चित्रपटाचं प्रमोशन सध्या करते आहे. हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होईल.

(फोटो सौजन्य – पिंक व्हिला, इन्स्टाग्राम)