‘मलायका – अर्जुनचं शुभमंगल!’ ...

‘मलायका – अर्जुनचं शुभमंगल!’ याच वर्षात होणार (Malaika Arora Arjun Kapoor Bollywood Celebrity Wants To Marry Mumbai Social Media Viral News)

बॉलीवूडमध्ये ज्या लग्नाची गेल्या काही वर्षांपासून चर्चा आहे त्या अभिनेत्री मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) च्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ते लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे, सोशल मीडियावर नेहमीच आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मलायका ही फिटनेस फ्रिक म्हणूनही लोकप्रिय आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाच्या फोटोंना चाहत्यांकडून प्रतिसाद मिळतो. काही दिवसांपूर्वी मलायकाला एका अपघातामध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती. दुसरीकडे बॉलीवूडमध्ये अजुनही जम न बसलेला अभिनेता म्हणून अर्जुन कपूरची ओळख आहे. मात्र त्याच्या आणि मलायकाच्या अफेयरनं ही जोडी कायम चर्चेत राहिली आहे.

मागच्या काही दिवसांपासून लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत असलेल्या अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या चर्चांचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र त्याचा रोख या चर्चांकडे असल्याचं बोललं जात आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मी या गोष्टीच्या प्रेमात पडलोय की, लोकांना माझ्यापेक्षा जरा जास्तच माझ्या आयुष्याबद्दल माहीत आहे.’

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मागच्या ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९ मध्ये पहिल्यांदा या दोघांनी सोशल मीडियावरून या नात्याची जाहीर कबुली दिली होती. यंदाच्या वर्षी मलायका आणि अर्जुन लग्नाच्या बंधनात अडकणार असून मुंबईतच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे जोडपं लग्न करणार आहे. मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हे लग्न कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थित पार पडणार असल्याचंही बोललं जात आहे. रणबीर – आलिया, कॅटरिना – विकी कौशल प्रमाणे हे लग्न टॉप सिक्रेट असणार आहे. अरबाज खानकडून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचा हा दुसरा विवाह असणार आहे. इतर सेलिब्रेटींप्रमाणे आपल्याला मोठ्या धुमधडाक्यात लग्न करायचे नसल्याचे यापूर्वी दोन्ही सेलिब्रेटींनी एका मुलाखतीतून सांगितले होते.

मलायका आणि अर्जुन नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल बिनधास्तपणे बोलताना दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अरोरानं अर्जुनचं खूप कौतुक केलं होतं. लग्नाच्या चर्चांबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ती आणि अर्जुन कपूर यावर विचार करत आहेत. दरम्यान दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे. मलायका ४८ वर्षांची आहे तर अर्जुन ३६ वर्षांचा आहे.