बायकोला शेतात झोपायला लावण्याची सक्ती करणे हा अ...

बायकोला शेतात झोपायला लावण्याची सक्ती करणे हा अक्षम्य छळ! (Making Wife Sleep In Field Is Cruelty : Court Upheld The Husband Guilty)

गोष्ट तशी जुनी आहे, पण पत्नीचा क्रूरपणे छळ करणार्‍या पतींना अद्दल घडविणारी आहे. कायद्याने कितीही बंदी घातली, तरी हुंडा मागण्याचा निर्लज्जपणा अंगी बाणवलेल्या सासरकडच्या मंडळींना धडा शिकवणारी आहे. उत्तर प्रदेशातील न्यायालयाने पीडित पत्नीच्या बाजूने निवाडा देऊन तिच्या पतीला दोषी ठरविले होते.
उत्तर प्रदेशातील मनोरथपूर गावातील तरुण मुलगी आपण तिला शालू म्हणू – लग्नानंतर सुलतानपूर गावी, आपल्या सासरी नांदायला आली. शालूचा नवरा रामावतार (मूळ नाव वेगळे) आणि त्याचे आई-बाबा; अर्थात् शालूचे सासू-सासरे यांनी तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही, म्हणून तिला टोचून बोलायला सुरुवात केली. आपल्या घरी परत जा आणि तुझ्या बापाकडून हुंडा घेऊन ये, असा धोशा या सगळ्यांनी मिळून तिच्याकडे लावला. तिनं नकार देताच, या लोकांनी शालूचा शारीरिक आणि मानसिक छळ आरंभला. पैसे नाही तर एसयुव्ही श्रेणीतील मोटारकार घेऊन ये, असाही हट्ट त्या लोकांनी धरला. फारच नाइलाज झाला आणि त्यांचा छळ सहन न झाल्याने शालूने आपल्या घरच्या लोकांना या हुंड्याच्या मागणीचा निरोप पाठवला.

शेतात झोपण्याची शिक्षा
आपल्या मुलीचा छळ झालेला, कोणत्या आईबापांना आवडेल? त्यांनी परिस्थिती नसताना, कसेतरी पैसे जमवून 1 लाख रुपये, हुंडा म्हणून शालूच्या सासरी नेऊन दिले. पण अधिक पैशांसाठी हपापलेल्या या मंडळींचे समाधान काही झाले नाही. त्यांनी शालूचा छळ करण्याचा आपला कार्यक्रम चालूच ठेवला. पोरगी बधत नाही, हे बघून सासरच्या माणसांनी शालू आणि रामावतार यांना आपल्या शेतात जाऊन झोपण्याची शिक्षा फर्मावली. शेतात उघड्यावर कसं झोपायचं, म्हणून शालूने पुष्कळ विनवण्या केल्या, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. तशातच शालूला दिवस गेले, तर या करंटीचं मूल आपल्या घरात नको, म्हणून तिचा बळजबरीने गर्भपात करून घेतला. इतकेच नव्हे तर रामावतारने शालूला तिच्या माहेरी आणून सोडले. अन् लवकरच परत घेऊन जातो, असं सांगून गेला तो तिकडे फिरकलाच नाही.

सासरी नांदायची सोडून आपली तरुण मुलगी माहेरी कशी राहणार, या काळजीपोटी तिच्या आई-बाबांनी रामावतारकडे तिला परत नेण्याची याचना केली. पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय तिला नांदायला आमच्या घरी नेणार नाही, असे निर्लज्ज उत्तर त्याने दिले.
न्याय मिळाला वर्षभर माहेरी राहून शालूने एका वकिलाकरवी, रामावतारला आपल्याला परत घेऊन जाण्यासंबंधी कायदेशीर नोटीस पाठवली. त्यावर त्याने काहीच दाद दिली नाही. तेव्हा तिने कोर्टात धाव घेतली. हुंडा मागणे, त्यावरून तिचा छळ करणे, शेतात उघड्यावर झोपायला भाग पडणे आणि कायदेशीर नोटिशीची दखल न घेणे, या कारणांवरून न्यायालयाने शालूला घटस्फोट मिळवून दिला. अन् तिचा अक्षम्य छळ केल्याप्रकरणी रामावतार व त्याच्या आई-वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले. अशा रितीने शालूला न्याय मिळाला!