बाथरुममधील मेकअप कॉर्नर (Makeup Kit In Bathroom)

बाथरुममधील मेकअप कॉर्नर (Makeup Kit In Bathroom)

सौंदर्यप्रसाधनांचा वापर आपण बहुतांशी कोरड्या त्वचेवर करतो. परंतु ओल्या त्वचेवर यांचा वापर केल्यास ती अधिक परिणामकारक ठरतात. म्हणूनच तुमच्या बाथरुममध्ये नेहमीच्या साबण, शाम्पू याव्यतिरिक्त कोणती प्रसाधने असावीत, ते पाहूया.

फेस आणि बॉडी क्लींजर

आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रसाधनांचा वापर करण्यापूर्वी आपल्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, हे जाणून घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे फेस क्लींजर बाथरुममध्ये ठेवा. फेश वॉश, क्लींजिंग लोशन, हर्बल क्लींजर बार या तीन पर्यायांपैकी तुमच्या त्वचेस सूट करणारा पर्याय निवडा आणि तो बाथरुममध्ये ठेवा. बॉडी क्लींजिंगसाठी लुफा किंवा बॉडी ब्रशचा वापरही करता येईल. लांब बॉडी ब्रशवर थोडेसे बॉडी वॉश लावा आणि एकदा शॉवर घेऊन ओल्या पाठीवर बॉडी ब्रश करा. यामुळे पाठीला व्यवस्थित स्क्रबिंग तर होईलच शिवाय ब्लशर सर्क्युलेशनही होईल.

इंटीमेट वॉश

शॉवर बाथ घेताना दिवसातून एक वेळ इंटीमेट वॉशचा वापर करा. यामुळे तुम्हाला दिवसभर तजेलपणाचा अनुभव येईल. उन्हाळ्याच्या दिवसांत जंतुसंसर्गाचा धोकाही कमी होईल.

डेली लिक्विड केअर

प्रदुषणाचा सर्वाधिक परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. ती कोरडी पडते. अशा वेळी योग्य मॉइश्‍चरायजरच्या वापराने आपण आपली त्वचा सुरक्षित ठेवू शकतो. मॉइश्‍चरायजर योग्य असले पाहिजे, नाहीतर त्वचा सुरकुतेल. चेहर्‍याचे तेज नाहिसे होईल. आंघोळीनंतर केव्हाही घराबाहेर पडताना चेहर्‍यास सनस्क्रीन लोशन लावा. त्वचा तेलकट असल्यास त्यासाठीचे सनस्क्रीनही उपलब्ध असते. त्वचा कोरडी असल्यास आधी चेहर्‍यास मॉइश्‍चरायजर क्रीम लावावी अन् मग टॉप कोट सनस्क्रीन लावा.

बॉडी लोशन

केवळ चेहराच नव्हे तर संपूर्ण शरीरावर प्रदूषणाचा परिणाम होत असतो. अशा वेळी आंघोळ केल्यानंतर बॉडी लोशन लावा कारण त्यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राहते. उन्हात बाहेर पडणार असाल तर सूर्यकिरणांपासून संरक्षण करणारे लोशन लावा.

बॉडी ऑइल

आठवड्यातून एकदा तेल लावून आंघोळ करा. तिळाचं तेल अभ्यंगासाठी उत्तम असतं. ते अंगाला लावून 45 मिनिटं तसंच राहू द्या. नंतर बॉडी वॉश न लावता नेहमीप्रमाणे आंघोळ करा. पातळ टॉवेलने अंग कोरडे करा. यामुळे आपल्या मांसपेशी रिलॅक्स होतील. तसेच पाय आखडणे, सांध्यांत दुखणे यांसारख्या समस्या राहणार नाहीत अन् तणावामुळे होणार्‍या समस्या देखील दूर होतील.

हेअर केअर प्रॉडक्ट

आपल्याला नियमितपणे लागणारा शाम्पू आणि कंडीशनर तर बाथरुममध्ये असतातच. केसांसाठीच्या प्रसाधनांमध्ये लव्हेंडर असेंशियल ऑइलचे एक एक थेंब मिक्स केल्यास केसांना छान सुगंध येईल आणि डोकंही जड होणार नाही. असेंशिअल ऑइलमुळे दिवसभर तन-मन प्रफुल्लित राहील.

योग्य टॉवेल

ओले केस बांधून ठेवण्यासाठी नेहमी पातळ टॉवेलचा वापर करा. यामुळे केसांतील नैसर्गिक तेल सुरक्षित राहते. केस आणि त्वचा कधीही टॉवेलने जोरात घासू नये. त्यामुळे केस आणि त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाऊन ते शुष्क होतात.

मेकअप कॉर्नर

बाथरुममध्ये एक छोटासा मेकअप कॉर्नर असावा, ज्यात लिपस्टिक, काजळ, परफ्युम, बीबी क्रीम आणि फेस पावडर यांसारखी प्रसाधने असावीत. एखाद्या दिवशी बेडरुममध्ये कोणी बसले असल्यास आपण बाथरुममधूनच तयार होऊन येऊ शकतो. त्यासाठी हा मेकअप कॉर्नर हवाच.