या कपाटात दडलं काय? (Make More Room In The Ward...

या कपाटात दडलं काय? (Make More Room In The Wardrobe)

कपाट कितीही मोठं असलं, तरी आपल्याला त्यातील जागा कमीच वाटते. ही जागा कशी वाढवता येईल, त्याविषयी…

एकतर या कपाटात कपडे शिरत नाहीत आणि शिरलेच तर पुन्हा हवे असतील, तेव्हा सापडत नाहीत… कपाट लहान असो वा मोठं, घराघरांत कपाटाच्या बाबतीत हे वाक्य अगदी सर्रास ऐकू येतं. यात अर्थातच कपाटाची किंवा कपड्यांची चूक नाही. यास कारणीभूत ठरतात आपल्या वाईट सवयी. कपडे व्यवस्थित घडी करून, रचून न ठेवणं, घालायचे नाहीत असेही कपडे कपाटात सांभाळून ठेवणं… या आणि अशा अनेक कारणांमुळे आपलं कपाट कितीही मोठं असलं, तरी त्यातील जागा कमीच वाटते. हे टाळण्यासाठी काही उपाय करता येतील.

– तुमच्या कपाटात जागा कमी आणि कपडे जास्त असतील, तर वारंवार वापरले न जाणारे कपडे व्यवस्थित पॅक करून कपाटाच्या वरच्या खणात ठेवा. यात तुम्ही स्वेटर-शाल, भरजरी ड्रेस, साड्या इत्यादी ठेवू शकता. त्यामुळे नेहमी वापरातील कपड्यांना व्यवस्थित समोरची जागा मिळेल.
– सर्व कपडे योग्य विभागणी करून व्यवस्थित घडी करा आणि मग कपाटात रचून ठेवा. म्हणजे, साड्या, पंजाबी ड्रेस, शर्ट, पँट, जीन्स अशी वेगवेगळी विभागणी करा. सर्व काही वेगवेगळं मात्र व्यवस्थित घडी करून ठेवा.
– कपड्यांचे सेट असतील तर ते एकत्र ठेवा. म्हणजे, सलवार-कमीज-ओढणी, साडी-ब्लाऊज असे सेट एकत्र ठेवा.
– कपडे नेहमी इस्त्री करूनच कपाटात ठेवा. यामुळे कपडे व्यवस्थित रचणं शक्य होईल आणि जेव्हा ते परिधान करायचे असतील, तेव्हा गैरसोयही होणार नाही.
– जे कपडे वर्षभर वापरलेच नाहीत, ते कपाटातून बाहेर काढा. ज्या कपड्यांच्या बाबतीत वापरावेत की नाही असं मनात द्वंद्व असेल, त्यांनाही कपाटाबाहेरचा रस्ता दाखवा.

– कपाटातील स्टोरेज स्पेस वाढवण्यासाठी त्यात विविध ड्रॉवर्स ठेवा. म्हणजे कपडे वेगवेगळे मात्र व्यवस्थित रचून ठेवता येतील.
– कपाटाच्या दरवाजावर हुक लावून त्यावर पट्टे, स्कार्फ, टाय इत्यादी लटकवा.
– बाजारात अनेक कप्पे असलेल्या हँगिंग बॅग्ज मिळतात. या कपाटात लटकवून ठेवता येतात. याच्या कप्प्यांमध्ये दागिने, रुमाल टिकल्या, नेलपॉलिश, सेफ्टी पिन इत्यादी रचून ठेवता येईल.
– चांगल्या दर्जाचे आणि कपड्यांच्या प्रकारानुसार योग्य प्रकाराचेच हँगर्स वापरा. यामुळे कपडे चुरगळणार नाहीत आणि गंज वगैरेमुळे खराबही होणार नाहीत.
प्रत्येक वेळी कपाटात कपडे ठेवताना आणि कपाटातून कपडे बाहेर काढताना घाई करू नका. कपडे व्यवस्थित हाताळा, म्हणजे कपाट व्यवस्थित राहील आणि मुद्दाम वेळ काढून ते लावावं लागणार नाही.