फॅशनेबल छत्रीने बनवा, मान्सून लूक आकर्षक (Make ...

फॅशनेबल छत्रीने बनवा, मान्सून लूक आकर्षक (Make Monsoon Look Charming With Fashionable Umbrella)

चिंब चिंब भिजताना, पावसाशी जुळते मैत्री

अलवारपणे सर झेलताना, डोईवर उभी राहते छत्री

खरोखर पावसाला सुरुवात झाली की पहिल्यांदा ज्या गोष्टीची शोधाशोध होते ती म्हणजे छत्री. पावसात भिजणे कितीही आवडीचे असले तरी कामासाठी बाहेर पडताना छत्री सोबत घ्यावीच लागते. नि आता तर काय, छत्री देखील आधुनिक फॅशनिस्टाच्या अलमारीचा अविभाज्य भाग बनली आहे. सध्या पावसाची बरसात सुरु झाल्यानं छत्र्यांची खरेदी होऊ लागलीय. कपडे, बॅगा फॅशनेबल वापरत असताना छत्री पण तशीच फॅशनेबल हवी. हे लक्षात घेता बाजारातही दरवर्षीप्रमाणे मागणी आणि आवडीप्रमाणे विविधतेने नटलेल्या छत्र्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

कलरफूल, मस्त डिझाइनच्या, विविध स्थळांची चित्रं असलेल्या डोम शेपच्या छत्र्या, प्लेन रंगासोबत फ्लुरोसंट रंगसंगती असलेल्या छत्र्या, तरुणाईचं ऑल टाइम फेव्हरेट असलेल्या पोल्का डॉट छत्र्या, फ्रिल असलेल्या आकर्षक रंगांच्या छत्र्या, जम्बो छत्र्या असे अनेक नवनवीन प्रकार बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. पारंपरिक छत्र्यांबरोबर फोल्डिंगच्या छत्र्या, मोठा दांडा असलेल्या छत्र्या, रेनकोट मटेरिअलच्या छत्र्या, पारदर्शक कापड असलेल्या छत्र्या, अॅनिमल प्रिंट छत्र्या, न्यूजपेपर प्रिंट असलेल्या छत्र्या, लहान मुलांसाठीच्या कार्टुनच्या छत्र्या यांसारखे काही प्रकारही पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे, आजकाल प्रत्येकाच्या आवडीच्या गोष्टी, चित्रं, मेसेज रेखाटलेल्या कस्टमाइज्ड छत्र्याही बनवून घेता येतात.