सौंदर्याची स्वच्छता? ती कशी राखावी (Maintain Yo...
सौंदर्याची स्वच्छता? ती कशी राखावी (Maintain Your Beauty With Cleanliness)

सौंदर्य स्वच्छता म्हणजे आपली त्वचा, केस, डोळे, नखे किंवा सौंदर्याशी संबंधित कोणताही भाग स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवणे. तसेच सौंदर्य उत्पादने आणि मेकअप साधने स्वच्छ ठेवणे.
सौंदर्याची आकांक्षा कोणाला नाही? परंतु सौंदर्यासाठी नुसतीच इच्छा असून ते मिळत नाही तर त्यासाठी थोडी मेहनत करणे आवश्यक आहे सौंदर्यासाठी अमुक करा, हे वापरा, हे खा… असं आपण नेहमीच वाचत आलो आहोत. आज आपण सौंदर्यासाठी आवश्यक अशी एक महत्त्वाची बाब जाणून घेऊया. ती बाब आहे स्वच्छता. स्वच्छता ही सौंदर्याची पहिली अट आहे. आता तुम्ही विचार कराल की सुंदर दिसण्यामध्ये स्वच्छता कुठून आली? तर त्वचा असो, केस असो, ओठ असो किंवा डोळे यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर यांचं सौंदर्य अबाधित राहणार नाही.

सौंदर्याची स्वच्छता नाही राखली तर…
जर सौंदर्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही तर कधी त्वचेचा संसर्ग, कधी डोळ्याची समस्या, कधी केस गळणे, खाज येणे किंवा नखे अथवा ओठांची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर यामुळे आपल्याला आजार वा इतर कोणत्याही प्रकारचं संक्रमण होऊ शकते. शरीर आजारी पडल्यावर सौंदर्य निरोगी कसे राहिल? सौंदर्याची स्वच्छता (ब्यूटी हायजीन) म्हणजे काय आणि ते कसे टिकवायचे ते जाणून घेऊया. सौंदर्य स्वच्छता म्हणजे आपली त्वचा, केस, डोळे, नखे किंवा सौंदर्याशी संबंधित कोणताही भाग स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवणे. तसेच सौंदर्य उत्पादने आणि मेकअप साधने स्वच्छ ठेवणे.
सौंदर्याची स्वच्छता कशी राखावी?
– आपल्या त्वचेच्या थेट संपर्कात येणारी कोणतीही गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा. आपल्या हातांनी चेहर्याला पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका.
– आपले हात साबणाने नियमितपणे स्वच्छ करत राहा.

– फेस नॅपकिन्सचा पुन्हा वापर टाळा. ते स्वच्छ धुवून मगच त्यांचा वापर करणे चांगले होईल.
– मुरुमांना पुन्हा पुन्हा स्पर्श करू नका आणि त्यांना नख लावून फोडू नका.
– आपली नखं स्वच्छ ठेवा. त्यांच्यामध्ये बरेच जंतू वाढू शकतात. शक्यतो नखं वाढू दिली नाही तर चांगले होईल, लांब नखांमध्ये घाण साचण्याची शक्यता असते, ज्यामुळे संसर्गाचा धोका कायम राहतो. तुम्हाला नखे लांब ठेवायची असतील तर ती पूर्णपणे स्वच्छ ठेवा.

– केसांमध्ये जास्त वेळा स्टायलिंग उत्पादने वापरणे टाळा. केसांमध्ये घाम असल्यास, ते कोरडे करा आणि त्यांना सैलपणे बांधून ठेवा.
– घामामुळे केसांना दुर्गंधी येतेच शिवाय स्कॅल्पमध्ये इन्फेक्शन आणि डोक्यातील कोंडा यासारख्या समस्या निर्माण होतात.
– केसांच्या आरोग्यासाठी टाळू निरोगी आणि आरोग्यदायी असणे खूप महत्वाचे आहे.
– टाळूमध्ये खाज सुटण्यासारखी समस्या असल्यास, त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.

मेकअप करताना काय करावे आणि काय करू नये!
– तुमची मेकअप करण्याची प्रसाधने कोणासोबतही शेअर करणे टाळा.
– नेहमी ब्रशने लिपस्टिक लावा. बहुतेक लोक लिपस्टिक थेट बोटाने किंवा थेट ओठांवर लावतात, त्यामुळे जिवाणूंच्या वाढीचा धोका जास्त असतो.
– लिप ब्रशपासून मेकअपची सर्वच साधने नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा.
– त्वचेची नियमित काळजी घ्या – स्वच्छता, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग करा.
– काजळापासून आयलायनरपर्यंत कोणतंच प्रसाधन शेअर करू नका.
– तुमचा कंगवा स्वच्छ ठेवा. आपला कंगवासुद्धा शेअर करू नका.

– खाजगी भागांची स्वच्छता ठेवा आणि नको असलेले केस नियमित स्वच्छ करा.
– त्वचा आणि मेकअप उत्पादनांची एक्सपायरी डेट तपासत राहा.
– सर्व उत्पादनांच्या शेल्फ लाइफची जाणीव ठेवा.
– त्वचेची छिद्रे स्वच्छ ठेवावीत जेणेकरून घाम, तेल आणि घाण त्यांच्यामध्ये जमा होणार नाही. नाहीतर मुरुमे होऊ शकतील.
– कच्चे दूध घेऊन आणि त्यात थोडे मीठ घालून त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेची छिद्रं देखील साफ होतील आणि एक प्रकारे स्क्रबिंग देखील होईल.
– कोमट पाण्याने चेहरा धुवून झाल्यावर चेहरा पुन्हा थंड पाण्याने धुवा, जेणेकरून त्वचेवरील छिद्रं बंद होतील.
– नियमितपणे एक्सफोलिएट करा. त्याने मृत त्वचा आणि मृत पेशी निघून जाऊन त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहिल.
– पायाच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्या. पायांना घामाचा वास येणं त्रासदायक आहे. घामामुळे जंतूंची भरभराट होते. आपल्या चपला आणि मोजे स्वच्छ ठेवा. अन्यथा पायांच्या त्वचेस संसर्ग होऊ शकतो.
– आंघोळ करताना पायांना चांगले घासून घ्या आणि नंतर मॉइश्चराइज करा.

– त्याचप्रमाणे, शरीराच्या अंतर्गत भागांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. अंडरआर्म स्वच्छ ठेवा.
– जर जास्त घाम येण्याची समस्या असेल तर त्यावर उपचार करा.
– खूप घट्ट असलेले कपडे घालू नका, अशा कपड्यांमध्ये त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि संसर्गाचा धोका राहतो.
– सूती पँटी घाला. जी तेथील नाजूक त्वचेची विशेष काळजी घेऊ शकेल.
– बिकिनी क्षेत्र आणि अंडरआर्म्सचं शेव्हिंग करत असाल तर, शेव्हिंगनंतर मॉइश्चराइज करा.
– वॅक्सिंग करत असाल, तर स्ट्रिंजेंट लावा आणि मॉइश्चराइज करा. सौंदर्याशी संबंधित या सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला नेहमी सुंदर ठेवतील आणि तुमचं सौंदर्य देखील निरोगी आणि स्वच्छ राहील.