असावा उबदार विसावा (Maintain Warmth at Home)

असावा उबदार विसावा (Maintain Warmth at Home)

थंडी बोचणारी असो नाहीतर नुसतीच जाणवणारी, ती त्रासदायक ठरण्यापूर्वीच त्यासाठीचा उपाय योजणं हितकारक नव्हे काय…

खरं तर कोणताही महिना असो घर हे ऊब देणारंच असावं लागतं. मग ती ऊब मायेची असो वा घरातील वातावरणाची! ऋतुमानानुसार हवामानात होणार्‍या बदलाशी जुळवून घेऊन त्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये बदल करण्याची कला प्रत्येक माणसाला अवगत झालेली आहे. अगदी जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही माणूस गेला तरी, तो तेथील वातावरणात कधी लगेच तर कधी विलंबाने, पण समरस होतो. कारण थंड, उष्ण, आर्द्र अशा सगळ्याच वातावरणाशी तो जुळवून घेऊ लागला आहे. म्हणजे, साधारण त्याला माहीत झालं की, आता थंडीचा महिना आहे तर त्या वातावरणाचा त्रास होण्याआधीच तो त्यासाठीची तरतूद करून ठेवतो.

थंडीच्या दिवसांत आपल्याला छान झोप लागते. दोन दोन पांघरूण घेऊन आपण झोपतो. गरमागरम, मसालेदार पदार्थ खाण्यासाठी जीभ सोकावते. पहाटेचं कोवळं ऊन अंगावर घेत मस्त आल्याचा चहा पिण्यातला आनंद संपूर्ण दिवसभर ताजंतवानं ठेवतो. घरात मिळणारी ही ऊब सोडून आपल्याला बाहेर पडावसं वाटत नाही. मुंबईत अगदी बोचणारी थंडी नसली तरी, जाणवणारी असते. परंतु आपल्या देशातील काही प्रांतात कायम थंड वातावरण असते. त्यामुळे बाहेर थंड असलं तरी घरात उबदारपणा ठेवण्यासाठी काहीना काही पर्याय शोधावे लागतात. घरसजावटीमध्ये फेरफार हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

थंडीच्या दिवसात घर ठेवा उबदार

 • सर्व प्रथम दिवाणखान्यात बदल करूया. येथील फर्निचरची जागा अदलाबदली करा.
 • दिवाणखान्यातील एखाद्या कोपर्‍यात कँडल्स तेवत ठेवा. त्या अरोमा कँडल्स असतील तर उबेच्या सोबत घरात प्रसन्नता आणणारा सुगंधही दरवळत राहील.
 • भिंती रिकाम्या असतील तर खोलीमध्ये जास्त थंडावा जाणवतो. त्यामुळे दिवाणखान्यातील भिंतीवर पेंटिंग किंवा फोटोफ्रेमचे कोलाज करून लावा. किंवा वॉल हँगिंग आणि वॉल आर्टने भिंतीचं रूप बदला.

 • दिवाणखान्याच्या सजावटीकरिता स्टोन आणि लाकडाच्या वस्तूंचा वापर करा. वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे स्टोन्स रंगीत बाऊलमध्ये ठेवून मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवा.
 • घरात सजावटीसाठी झाडे ठेवत असाल तर त्यामुळे दमटपणा जाणवतो. तेव्हा झाडं ज्युटच्या बास्केटमध्ये ठेवून घराला वेगळेपणा द्या. ही झाडं रंगीत लाइटने सजवा.
 •  जुने न वापरले जाणारे स्वेटर्स असतील तर त्यापासून डोअरमॅट, उशीचे कव्हर तसेच इतरही घरसजावटीसाठी उपयोगी वस्तू बनवा.

 • खिडक्यांसाठी गडद आणि हेवी लूक देणारे पडदे वापरा. पडद्यांसाठी सॅटीन, सिल्क आणि वेलवेट अशा कापडाचा वापर करा. हे पडदे सुंदरही दिसतात आणि ऊबही देतात.
 • थंडीच्या दिवसात घरातील फरशीही गार पडते आणि आपण दिवसभर घरात वावरताना आपल्या पायाचा जमिनीशी थेट संपर्क येत असल्याने फरशीसाठी कार्पेट किंवा रग्सचा वापर करा. गडद आणि रंगीत कार्पेट्समुळे घराचं सौंदर्यही खुलून दिसतं.
 • या दिवसांत घराला रंग देण्याचं ठरवत असाल तर गडद लाल, नारिंगी, सोनेरी, पिवळा आणि तपकिरी असा रंगाचा वापर करा. घराला फ्रेश लूक देण्यासाठी एक भिंत नारिंगी वा पिवळ्या रंगाने रंगवा.
 • घरात रोमँटिक वातावरणाचा फिल राहावा यासाठी डेकोरेटिव्ह लाइट स्टँड ठेवा. नाहीतर गडद रंगाचे लँप शेड ठेवा. यामुळे खोलीत उबेचा स्पर्श जाणवत राहतो.
 • थंड वातावरणात दिवाणखाना, स्वयंपाकघर अशा मोठ्या रूममध्ये सॉफ्ट विजेचे दिवे वापरावे. त्याचा प्रकाश संपूर्ण घरभर पसरतो. आणि घरात कृत्रिम प्रकाशाची गरज नसेल तेव्हा अर्थात सकाळी कँडल्ससारख्या होम अ‍ॅक्सेसरीजचा वापर करा. यामुळे घरात सुखद, उबदार आणि समाधानकारक अनुभूतीचा प्रत्यय येईल.