विनोदी थरारपट ‘कलावती’चा मुहूर्त (M...

विनोदी थरारपट ‘कलावती’चा मुहूर्त (Mahurat Of Horror Comedy ‘kalavati Took Place : Film Has Galaxy Of Stars)

गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला.  वेगवेगळ्या जॉनरचे  मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्ते प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते.  तसंच, चित्रपटातील कलाकारांसोबत इतर टीमनं देखील मुहूर्त सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.  चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.

आतापर्यंत संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’,’चेकमेट’, ‘खारी बिस्किट’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘तमाशा लाइव्ह’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. पण आता पहिल्यांदाच संजय जाधव ‘कलावती’ या चित्रपटाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनर घेऊन भेटीस येत आहेत, त्यामुळे निश्चितच उत्सुकता आहे. अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय शेजवळ, नील साळेकर(इन्फ्लूएन्सर) अशी कलाकारांची तगडी टीम ‘कलावती’ या चित्रपटात दिसणार आहे.

के.एफ. फिल्म्स लिमिटेड, ताहेर सिने टेक्निक्स, अमेय खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्वाती खोपकर प्रस्तुत ‘कलावती’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी प्रजय कामत यांनी उचलली आहे.  तर सह-निर्माते म्हणून निनाद नंदकुमार बत्तिन, तबरेज पटेल, परीन मेहता, निश्चय मेहता, नवीन कोहली काम सांभाळणार आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून वैशाली तुथिका आणि सावित्री धामी काम पाहतील.  दिग्दर्शनाची जबाबदारी उचलण्यासोबतच संजय जाधव हे ‘कलावती’ चित्रपटाचे ‘डीओपी’ म्हणूनही काम पाहणार आहेत. चित्रपटाचे संगीतकार पंकज पडघन हे असणार आहेत.  मराठीतील प्रसिद्ध लेखक अभिजित गुरुनं चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर चित्रपटाची कथा निशांत भुसे आणि अनुजा कर्णिक यांची आहे.