महिमा मकवाना : चाळीत वाढली, ५०० वेळा नाकारली, त...

महिमा मकवाना : चाळीत वाढली, ५०० वेळा नाकारली, तरी यशस्वी झाली (Mahima Makwana Had To Face Rejection So Many Times, Due To This Compulsion, She Started Acting At Young Age)

बालकलाकार म्हणून आपली अभिनय कारकीर्द सुरू केलेली महिमा मकवाना आज टी.व्ही.च्या  कित्येक लोकप्रिय कार्यक्रमात गाजली आहे. आज तिच्याकडे कसलीही कमतरता नाही. पण एक वेळ अशी होती की, तिचे कुटुंब गरिबीने ग्रासलं होतं. घरचं उत्पन्न अतिशय कमी होतं. त्यामुळे त्यांची परिस्थिती हलाखीची होती… महिमाला आणखी काय काय सोसावं लागलं ते पाहूया…

महिमाचा जन्म मुंबईचा आहे. ती फक्त ६ महिन्यांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिची आई सोशल वर्कर होती. शिवाय ती टेलरिंगचं काम करत होती. त्यातून कमाई फार होत नव्हती. घरातील कर्ता पुरुष गमावून बसल्याने मकवाना कुटुंबाची हलाखीची परिस्थिती झाली होती. त्यामुळे ९-१० वर्षांची असतानाच महिमाने ॲक्टींग क्षेत्रात पदार्पण केलं. पण या क्षेत्रात पुढे तिच्या मार्गात काटे पसरले होते. कारण तिला एक-दोन नव्हे तर जवळपास ५०० वेळा नाकारण्यात आलं. (रिजेक्शन) पण महिमाने कच खाल्ली नाही. अन्‌ चिकाटीने झुंज देत राहिली.

लहान वयात अभिनयाची सुरुवात महिमाने केली. ‘मोहे रंग दे’ या २००८ साली आलेल्या मालिकेतून महिमाने आपल्या उत्कृष्ट अभियनयाची छाप पाडली. नंतर तिला बऱ्याच मालिकांत कामे मिळाली.

२०१९ साली महिमाचा ‘वेंकटपुरम’ या तेलुगु चित्रपटातून चित्रसृष्टीत प्रवेश झाला. तिच्या आईला पण अभिनेत्री व्हायचं होतं. पण मुलांच्या जबाबदारीने ते जमलं नाही. मात्र महिमाने अभिनेत्री म्हणून मोठं यश मिळविलं. अन्‌ जणू आईचं स्वप्न साकार केलं.

गेल्याच वर्षी महिमाने ‘अंतिम’ या चित्रपटामधून सलमान खान व आयुष शर्मा यांच्यासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या कामाची तारीफ झाली. त्यामुळे महिमा आनंदित झाली.

अलिकडेच एक नामांकित वेब पोर्टलला महिमाने मुलाखत दिली. त्यात तिने सांगितले की, “माझ्या आजच्या यशात चाळ संस्कृतीचा मोठा वाटा आहे. मी चाळीत लहानाची मोठी झाले. ते दिवस विसरता येत नाहीत. दहिसरला ही चाळ होती. चाळीतच माझं पालनपोषण झालं, हे सांगायला मला कमीपणा वाटत नाही. मी आजही त्या चाळीला भेट देते.”

महिमाने पुढे सांगितलं की, “चाळीत राहणाऱ्या माणसांना शेजाऱ्यांचा मोठा आधार असतो. लोकांची नाती घट्ट असतात. आपल्याकडे सण असो वा संघर्ष लोक मदत करतात. शेजारपाजाऱ्यांसोबत दिवाळी व होळी कशी साजरी केली होती, ते क्षण मी जपून ठेवले आहेत. पैसे आणि नीतिमूल्यांचं मोल काय असतं ते मी या चाळीतूनच शिकले. मी आणि माझ्या आईने खूप काबाडकष्ट केले व आजचं यश मिळवलं आहे.”

सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम