कंगना रणावतच्या ‘इमरजेंसी’ या आगामी...

कंगना रणावतच्या ‘इमरजेंसी’ या आगामी राजकीय चित्रपटात महिमा चौधरीची महत्त्वाची भूमिका (Mahima Chaudhry Joins Kangana Ranaut’s Film ‘Emergency’ See Her First Look From The Movie)

बॉलिवूडची वावटळ म्हणून प्रख्यात असलेली कंगना रणावत ‘इमरजेंसी’ या आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. तर आता तिने यात काम करणाऱ्या महिमा चौधरीचे फर्स्ट लूक प्रदर्शित केले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनाने हे प्रदर्शन केले आहे. या चित्रपटात महिमाला सांस्कृतिक कार्यकर्ती व लेखिका पुपुल जयकर यांची भूमिका देण्यात आली आहे. पुपुल जयकर यांचे नेहरू घराण्याशी घनिष्ठ संबंध होते. कंगना स्वतः इंदिरा गांधी यांची भूमिका करत आहे.

कंगना दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटात अनुपम खेर, जयप्रकाश नारायण यांची भूमिका करत आहेत.

सदर चित्रपटाची कथा माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनाभोवती फिरते. श्रेयस तळपदेला माजी पंतप्रधान व भाजपचे श्रेष्ठ नेता अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका देण्यात आली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगना लिहिते – ‘सादर करीत आहे महिमा चौधरी अर्थात्‌ पुपुल जयकर. ज्यांनी तो काळ अनुभवला व इंदिरा गांधी यांचे आत्मचरित्र लिहिले.’

महिमाच्या भूमिकेबद्दल इ टाइम्सशी बोलताना कंगनाने सांगितले की, ‘पुपुल जयकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी इंदिराजींचे आत्मचरित्र लिहिले.’

याबद्दल महिमा चौधरी म्हणते – ‘कंगना बरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय छान आहे. या चित्रपटात ती स्वतः इंदिराजी झाली आहे. दिग्दर्शन व निर्मिती पण करते आहे.’

‘तिचा आत्मविश्वास मोठा आहे. अन्‌ ती माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवते. हे काम करताना अभिमान वाटतो आहे. ती अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे,’ अशा शब्दात महिमाने कंगनाची प्रशंसा केली आहे.