ब्रेस्ट कॅन्सरशी झगडत असलेल्या महिमा चौधरीला ओळ...

ब्रेस्ट कॅन्सरशी झगडत असलेल्या महिमा चौधरीला ओळखणेही झाले मुश्किल, अनुपम खेरने शेअर केला हृद्यद्रावक व्हिडिओ (Mahima Chaudhry Is Battling Breast Cancer… Anupam Kher Shares Heart Touching Video, Says ‘You Are My Hero’)

परदेस चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री महिमा चौधरी सध्या कॅन्सरसारख्या भयंकर आजाराशी लढत आहे. अभिनेता अनुपम खेरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात महिमा तिचा भयानक अनुभव सांगत आहे.या व्हिडिओची सुरुवात होते ती खिडकीतून हसत बाहेर बघणाऱ्या तरुणीपासून जेव्हा कॅमेरा त्या तरुणीच्या चेहऱ्यापाशी येतो तेव्हा धक्का बसल्यावाचून राहत नाही, कारण ती तरुणी दुसरीतिसरी कोणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी असते. या व्हिडिओत महिमाला ओळखता येत नाहीये. आजारामुळे तिचे केस गेले आहेत.

अनुपम यांनी या व्हिडिओला, महिमा चौधरीची कॅन्सर आणि साहसाची कहाणी अशी कॅप्शन दिली आहे. अनुपमने सांगितले की, एका महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी महिमाला एका रोल संदर्भात फोन केला होता, त्यावेळी तिने तिला झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल त्यांना सांगितले. महिमा ही खरी हिरो असून इतर कॅन्सर झालेल्या महिलांसाठी ती एक प्रेरणा असल्याचे अनुपम म्हणाले. मी तिच्या कॅन्सरची बातमी जगासमोर आणावी अशी तिची इच्छा होती. आता महिमा सेटस् वर परतली आहे. खरेतर ते तिचे योग्य स्थान आहे. ती उंच भरारी घेण्यासाठी तयार आहे. जेवढे निर्माता दिग्दर्शक आहेत त्यांना महिमाचे टॅलेंट आजमावण्याची हीच संधी आहे. मित्रांनो तिला खूप शुभेच्छा आणि प्रेम द्या. अशी पोस्ट अनुपम खेर यांनी टाकली आहे.

व्हिडिओ प्ले केल्यावर महिमा अनुपम यांच्याकडे कॅमेरा फेस करत म्हणते की, एका महिन्यापूर्वी जेव्हा अनुपम यांचा त्यांच्या यु एसवाल्या नंबरवरुन फोन आला तेव्हा तो मला उचलावाच लागला, कारण एवढ्या लांबून ते मला फक्त हा-हा-ही-ही करण्यासाठी फोन करणार नाहीत हे नक्की. त्यावेळी मी केमो थेरपीसाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होते. तेव्हा त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची ऑफर दिली. मी त्यांना म्हणाली, मी काम नक्की करेन पण तुम्ही काही दिवस थांबाल का ? तेव्हा त्यांनी नाही, थांबायचे कशाला? आणि तू कुठे आहेस? इतका आवाज कसला येत आहे? असे विचारले. त्यावेळी मी माझे केस गमावल्याचे त्यांना सांगितले. या व्हिडिओत बोलताना महिमा भावूक झालेली दिसते. त्यावरुन तिचे दु:ख स्पष्ट दिसून येते.

पुढे अनुपमजींना, मी सेट वर विग घालून आले तर चालेल का असे महिमाने विचारले. त्यांनी त्याचे कारण विचारल्यावर महिमाने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले. तुला या आजाराबद्दल कसे समजले असा प्रश्न अनुपम यांनी विचारल्यावर महिमाने उत्तर दिले की, ती नियमित चेकअपला जायची. तेव्हा तिच्यात कॅन्सरचे कोणतेच निदान नव्हते. पण अचानक एक दिवस बायोप्सी केल्यावर तिला या आजाराबद्दल समजले. तसेच तिची ही पहिलीच स्टेज असून योग्य उपचारांनी ती पूर्णपणे ठिक होऊ शकते, असे महिमाने सांगितले.

या आजाराचा अनुभव सांगताना महिमा म्हणाली, जेव्हा तिला या आजाराबद्दल समजले तेव्हा ती खूप घाबरली, खूप रडली. पण त्यावेळी तिच्या बहिणीने तिला खंबीर आधार दिला. त्यानंतर डॉक्टरांनी देखील मला समजावले. या आजारावर निदान आहे तू नकारात्मक विचार करू नकोस. त्यावेळी मी स्वत:ला समजावले आणि आता त्या सकारत्मकतेचा रिझल्ट तुम्ही पाहतच आहात. आतासुद्धा मी सकारात्मकच असून माझं पुढचं आयुष्य जगायला पूर्णपणे तयार आहे. या व्हिडिओमध्ये बोलताना महिमा खूपदा भावूक झाली. पण तिचे गोड हसू पाहून ती खूप साहसी असल्याचे दिसून येते. महिमाने स्वत: देखील तो व्हिडिओ शेअर केला आहे.

महिमाचे चाहते व इतर दर्शक तिच्या साहसाचे व सकारात्मकतेचे कौतुक करत आहेत. तिच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.