महेश मांजरेकर यांना अटक होण्याची शक्यता बळावली ...

महेश मांजरेकर यांना अटक होण्याची शक्यता बळावली (Mahesh Manjrekar Likely To Be Arrested For Objectionable Scenes In Marathi Film)

‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांबाबत सुप्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली होती. त्यावर माहीम पोलिसांनी मांजरेकर यांच्याविरुद्ध पोक्सो आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने (पोक्सो) तसे आदेश दिले होते.

माहीम पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा व आपल्याला या अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मांजरेकरांनी उच्च न्यायालयात केली. त्याची सुनावणी करण्यात येऊन न्यायालयाने संबंधित खंडपीठाकडे याचिका करण्याची सूचना केली. मात्र अटकेपासून संरक्षण देण्याची मांजरेकरांची मागणी न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे या प्रकरणी, भविष्यात मांजरेकर यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.

या प्रकरणात आपला बचाव करताना मांजरेकरांनी म्हटलं आहे की, “चित्रपटात मुलांवर अन्याय झालेला नाही किंवा त्यांना त्रास दिलेला नाही. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविलेली दृश्ये चित्रपटाचा भाग नाहीत. त्यामुळे ती यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आली आहेत.” सर्वोच्च न्यायालयाने बॅन्डिट क्वीन या चित्रपटातील दृश्यांना परवानगी देताना, अशा प्रकारच्या गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून अशी दृश्ये दाखवणे गरजेचे आहे, असे म्हटले होते. असा दावा मांजरेकर यांनी या दृश्यांच्या संदर्भात केला आहे.