महेश मांजरेकर बनवणार नथुराम गोडसेंवर हिंदी चित्...

महेश मांजरेकर बनवणार नथुराम गोडसेंवर हिंदी चित्रपट! (Mahesh Manjrekar Announce A Film On ‘Godase’)

वास्तव, नटसम्राट असे एकापेक्षा एक गाजलेले चित्रपट तयार करणारे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंती दिवशी, त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली आहे. महेश मांजरेकर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गोडसे चित्रपटाचे टीझर शेअर केले आहे. ‘आजपर्यंत कुणीही सांगायचं धाडस केलं नाही, अशा गोष्टीसाठी सज्ज व्हा,’ अशा आशयाची पोस्ट करत मांजरेकरांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

तसेच “नथुराम गोडसे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या व्यक्तिमत्वावर चित्रपट तयार करायचे म्हटले तर प्रचंड धैर्य पाहिजे. मला परखड भाष्य करणारे विषय आणि कसलीही तडजोड न करता त्याची मांडणी केलेले चित्रपट नेहमीच आवडतात. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्यावर गोळी चालवली. त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली अशा मोजक्याच गोष्टी लोकांना माहिती आहे. ही गोष्ट सादर करताना आम्ही कुणाचं उदात्तीकरण करणार नाही किंवा कुणाच्या विरोधातही काही बोलणार नाही. योग्य आणि अयोग्य याचा निर्णय आम्ही प्रेक्षकांवर सोडू,” असं मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

संदीप सिंग आणि राज शांडिल्य हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगचे काम सुरू आहे. त्यानंतर या सिनेमासाठी कलाकारांची निवड केली जाणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २०२२ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी महेश मांजरेकर यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आणि ‘व्हाईट’ हे चित्रपट तयार केले आहेत.

हिंदुत्ववादी संघटना किंवा विचारसरणीच्या माध्यमातून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण केलं जात असल्याचे आरोप गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यात महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम