वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी (Maharani Avanti...

वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी (Maharani Avantibai Lodhi)

– अनघा शिराळकर

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी व ऑगस्ट क्रांतीचे 80वे वर्ष असल्याने ब्रिटिशांविरुद्ध लढा देणार्‍या काही स्वातंत्र्य सेनानींवर आपण मागील अंकापासून लेख देत आहोत. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये या वीरांगनांचे बलिदान महत्वाचे आहे, परंतु या स्वातंत्र्य सेनानींना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. या अंकात आपण वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी यांच्याबाबत जाणून घेणार आहोत.1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक स्त्री पुरुषांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या म्हणजेच इंग्रजांच्या विरोधात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष युद्धात सेनानी होते. महाराणी अवंतीबाई लोधीही या सेनांनींपैकीच एक. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात लढणारी ती एक शूर व झुंजार सेनानी होती.
अवंतीबाईचा जन्म 16 ऑगस्ट 1831 रोजी लोधी राजपूत घराण्यात झाला. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मंकेहाडी गावातील लोधी राजपूत घराण्यातील झुंजारसिंग यांची ती कन्या. अवंतीबाई लहानपणापासूनच अत्यंत धाडसी होती. तिने नेमबाजी, तलवारबाजी, घोडेस्वारी व युद्धकौशल्य यात नैपुण्य प्राप्त केले होते. तिची तलवारबाजी आणि घोडेस्वारी आसपासच्या परिसरात फार प्रसिद्ध होती.

लॉर्ड डलहौसीची मनमानी

लहान वयातच अवंतीबाईचा विवाह मध्यप्रदेशात बालाघाट जिल्ह्यातील रामगड म्हणजे सध्याचे दिंडोरी या गावाचे राजे लक्ष्मणसिंग लोधी यांचे पुत्र विक्रमादित्य यांच्याशी झाला. या दांपत्याला अमनसिंग व शेरसिंग असे दोन पुत्र झाले. 1850 साली राजा लक्ष्मणसिंग यांचे निधन झाले आणि विक्रमादित्य यांना राज्यपद स्वीकारावे लागले. परंतु राजा विक्रमादित्य यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचेही 1857 मध्ये निधन झाले. मुले लहान असल्याने राज्याची राणी म्हणून अवंतिकाबाईने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. तिने तो मोठ्या कौशल्याने व्यवस्थित चालवला व सांभाळलाही. त्यावेळी लॉर्ड डलहौसी हा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता. तो पक्का साम्राज्यवादी होता आणि सर्व कामात मनमानी करत होता. राज्यविस्तारात तो कोणाची कदर करीत नव्हता. ज्या राज्यात राजाला किंवा राणीला स्वतःचे प्रौढ मूल वारसदार नसेल ते राज्य ब्रिटिश हडप करीत असत. दत्तक पुत्राला राज्यकारभार करता येत नसे. अशा प्रकारे कानपूर, झांशी, नागपूर, सातारा, जैतापूर, संबलपूर, उदयपूर, करौली इत्यादी संस्थाने ब्रिटिशांनी ’कोर्ट ऑफ व्हॉईस’ अंतर्गत खालसा केली. प्रशासनासाठी तिथे तहसीलदाराची नियुक्ती करून त्या त्या संस्थांनिकांना निवृत्तिवेतन सुरू केले. राणी अवंतीबाईचे रामगड संस्थानही याप्रकारेच खालसा केले गेले. ब्रिटिश सरकारच्या या कूटनीतीमुळे संस्थानिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली.


ब्रिटिशांविरुध्द बंड पुकारले
ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी सर्व संस्थानिकांनी एकत्र येण्यासाठी राणी अवंतीबाईने खूप प्रयत्न केले. ब्रिटिशांचे नियम पाळायचे नाहीत असेही तिने आपल्या रयतेला सांगितले. ती आसपासच्या राजांना, संस्थानिकांना आणि जमीनदारांना पत्रे व बांगड्या पाठवीत असे. देशाचे रक्षण करण्यासाठी कंबर कसून तयार व्हा, नाहीतर या बांगड्या हातात भरून घरात बसा असा संदेश राणी आपल्या पत्रात लिहीत असे. या तिच्या धाडसी कृत्यामुळे तिची लोकप्रियता व विश्वासार्हता संस्थानिकांमध्ये व सामान्य जनतेमध्ये वाढली. सर्वांनी राणी अवंतीबाईला सहकार्य करण्याचे ठरवले. ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले, जागोजागी गुप्त सभा घेऊन क्रांतीची मुळे रोवली गेली. यातही विश्वासघातकी लोकांमुळे काही प्रमुख क्रांतिकारक इंग्रजांकडून मारले गेले. राणी अवंतीबाईला याचे फार दु:ख झाले. पण राणीने धीर न सोडता मोठ्या साहसाने आपल्या राज्यातील कोर्ट ऑफ व्हॉईसच्या अधिकार्‍यांना पळवून लावले आणि मध्यप्रदेशातील बंडाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. ही माहिती जबलपूरच्या कमिशनरला कळली. त्याने राणी अवंतीबाईला डेप्युटी कमिशनरला भेटण्याचा आदेश दिला. राणीने तो आदेश धुडकावून लावला आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली. रामगडच्या किल्ल्याची डागडुजी करून त्याला मजबूत केले. मध्यप्रदेशातील सर्व नेते म़ंडळींनी एकजूट करून त्यांनी राणीला पाठिंबा दिला. या सर्वांच्या मदतीने राणी अवंतीबाईने हल्ला करून काही क्षेत्रे ब्रिटिशांकडून आपल्या ताब्यात आणली.

वॉडिंग्टनचा दारुण पराभव

ब्रिटिशांविरुद्धच्या 1857 सालच्या बंडाळीनी पण चांगलाच जोर धरला होता. राणीने आपल्या 4000 सैन्यासह मंडला या ठिकाणावर हल्ला केला. ब्रिटिशांविरुद्ध तिची ही पहिली लढाई मंडलाजवळच्या खेरी गावात झाली. या युद्धात मंडलाचे डेप्युटी कमिशनर वॉडिंग्टन याला राणीने घायाळ करून त्याचा दारुण पराभव केला होता. तो भयभीत होऊन पळून गेला आणि मंडलावर राणी अवंतीबाईने पूर्ण ताबा मिळवला व काही महिने त्यावर राज्यही केले. याचा वॉडिंग्टनला सूड घ्यायचा होता. म्हणून परत त्याने आपल्या सैन्याची पुनर्गठना व पुनर्रचना केली आणि नव्या जोमाने रामगडावर हल्ला केला. यावेळी काही संस्थानिकांनी ब्रिटिशांशी संगनमत करून आपल्या सैन्यासह साथ दिली होती. त्यामुळे ब्रिटिशांचे सैन्यबळ चांगलेच मजबूत झाले होते. तरीसुद्धा राणीच्या सैन्याने निकराने त्याला तोंड दिले. पण सैन्यबळ कमी पडल्याने राणी अवंतीबाईने रामगडमधून बाहेर पडून देवहरगड हा डोंगर गाठला व तिथे परत सैन्याची जमवाजमव केली.


राणी अवंतीबाईचेे नाव सुवर्णाक्षरांत

ब्रिटिशांनी रामगड पूर्ण लुटून उद्ध्वस्त केले. त्यानंतर राणी देवहर गडावर गेल्याचे कळताच ते तिकडे गेले. ब्रिटिशांना शरण यावे असा संदेश वॉडिंग्टनने राणीला पाठवला. राणीने तो संदेश धुडकावून लावला व लढत लढत मरू पण शत्रूला शरण येणार नाही असा संदेश तिने वॉडिंग्टनला पाठवला. यानंतर काही दिवस ब्रिटिश सैन्यांशी राणी व तिचे सैन्य लढत राहिले. राणीचे बरेचसे सैन्य घायाळ झाले व मारलेही गेले. राणीच्या हाताला गोळी लागली आणि ती खाली कोसळली. चारी बाजूंनी शत्रूने घेरलेले पाहून राणीने आपल्या अंगरक्षकाची तलवार खेचून घेतली व स्वत:वर वार करून आपले आयुष्य संपवले. तो दिवस होता 20 मार्च 1858. राणीने मरण्यापूर्वी ब्रिटिशांना आपल्या जबानीत सांगितले की, या बंडखोरीला पूर्णपणे ती स्वतः जबाबदार असून जनतेला जबाबदार धरू नये. या तिच्या जबानीमुळे ब्रिटिशांकडून अनेकांचे अमानुष छळ व प्राण वाचले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन राणी अवंतीबाईने इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांत कोरले.

जंगलाची राणी

राणी अवंतीबाईसंबंधी अनेक लोककथा आणि लोकगीते गोंडी समाज व आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. तिला हे लोक आपली माता समजतात. या लोकांच्या म्हणण्यानुसार राणी अवंतीबाईही जंगलाची राणी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार जिथे जिथे ब्रिटिश लोक दिसतील तिथून राणी त्यांना हुसकावून लावत असे. तिच्या आक्रमक हल्ल्याने त्यांना पळता भुई थोडी होत असे.
2012 सालापासून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ’1857 चा स्वातंत्र्यलढा’ या अंतर्गत वीरांगना राणी अवंतीबाई लोधी हिची माहिती इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट केली आहे. नर्मदा खोरे विकास अधिकार समितीने जबलपूर येथील बार्गी धरण प्रकल्पाच्या एका भागाला राणी अवंतीबाई लोधी हिचे नाव दिले आहे. राणीचे चित्र असलेली दोन टपाल तिकिटे भारतीय टपाल खात्याने 20 मार्च 1988 आणि 19 सप्टेंबर 2001 रोजी प्रसिद्ध केली.