‘महाभारत’ मधील श्रीकृष्ण, नितीश भारद्वाजचा दुसर...

‘महाभारत’ मधील श्रीकृष्ण, नितीश भारद्वाजचा दुसराही संसार मोडला : म्हणतो कसा – मरणापेक्षा भयंकर असतो घटस्फोट (Mahabharat Actor Nitish Bharadwaj Announces Separation From His Second Wife, Says-divorce can be more painful than death)

कालच दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांचे कलाकार आणि रजनीकांत यांचे जावई धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता मनोरंजन विश्वातून आणखी एका घटस्फोटाची बातमी आली आहे. ‘महाभारत’ या भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकेमधील श्रीकृष्णाची भूमिका करणारे नितीश भारद्वाज यांनीही त्यांच्या आयएएस अधिकारी पत्नीस स्मिता गेट यांना काडीमोड दिला असल्याचे वृत्त आहे. स्मिता त्यांची दुसरी पत्नी होती.

नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता गेट या मध्य प्रदेश केडरच्या १९९२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नितीश आणि त्यांच्या पत्नीमधील वाद महिन्याभरापूर्वीच समोर आला होता, जेव्हा आरटीआयच्या माध्यमातून नितीश यांनी पत्नी स्मिता यांची वेतनश्रेणी, निवड कशी झाली आदी माहिती मागवली होती. आणि आता समजते की दोघेही २०१९ मध्येच वेगळे झाले होते. त्यांना जुळ्या मुली आहेत, त्या इंदूरमध्ये स्मितासोबत राहतात.

याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना नितीश म्हणाले, “सध्या हे प्रकरण कोर्टात आहे आणि आम्ही वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही, पण मी हे नक्कीच सांगू इच्छितो की घटस्फोट हा मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक आहे.”

सांगायचं म्हणजे नितीश यांनी दोन लग्नं केली आहेत. २७ डिसेंबर १९९१ रोजी विमला पाटील यांची मुलगी मोनिषा पाटील यांच्याशी त्यांनी पहिले लग्न केले. दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती, परंतु त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्यांची मुले आईसोबत लंडनमध्ये राहतात.

पहिल्या घटस्फोटानंतर सुमारे तीन वर्षांनी २००८ मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता गेट यांच्याशी दुसरे लग्न केले. स्मिताचेही हे दुसरे लग्न होते आणि तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. मित्रांनी दोघांना लग्नाची सूचना केली. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना दोन जुळ्या मुली आहेत, विभक्त झाल्यानंतर आता त्या आपल्या आईसोबत इंदूरमध्ये राहताहेत.