माधुरी पवारने केले टक्कल : सोशल मीडियावर सुरू झ...

माधुरी पवारने केले टक्कल : सोशल मीडियावर सुरू झाले चर्चा चक्कर (Madhuri Pawar’s Baldness Is Hot Topic On Social Media)

माधुरी पवार (Madhuri Pawar) आता मराठी सिनेमा आणि टी.व्ही. क्षेत्रात आघाडीची अभिनेत्री झाली आहे. बिनधास्त, डॅशिंग आणि अभिनय निपुण असलेल्या माधुरीने वेब सिरिजमध्ये पदार्पण केलं आहे. ‘रानबाजार’ या प्लॅनेट मराठीच्या नव्या सिरिजमध्ये माधुरी एका महत्त्वाकांक्षी आणि करारी राजकारणी महिलेची भूमिका करत असून त्यासाठी ती टक्कल केलेल्या रुपात दिसते आहे. तिनं केलेल्या या टक्कलधारी व्यक्तीरेखेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

आपल्या सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्री ग्लॅमरस्‌ लूकबद्दल फार जागरूक असतात. पण माधुरीने यात न अडकता, भूमिकेची मागणी म्हणून टक्कल केलेल्या अवस्थेत अभिनय केला आहे. तिचे हे धाडस  कौतुकास्पद आहे.

‘रानबाजार’ या सध्या सुरू असलेल्या वेब सिरिजमध्ये प्रेरणा सायाजीराव पाटीलची भूमिका माधुरीने केली आहे. वडिलांच्या निधनानंतर प्रेरणाने जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी केलेले मुंडन (जे सर्वसाधारणपणे पुरुष मंडळी करतात) आणि त्या रुपात चालू ठेवलेला राजकीय प्रवास, असे या भूमिकेचे स्वरुप आहे.

ही भूमिका अनपेक्षितपणे, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यामुळे आली असं सांगून माधुरी म्हणते, “या भूमिकेसाठी मी खूप मेहनत घेतली. राजकारणातील लोकांना भेटले. राजकारणात सक्रीय असलेल्या महिलांच्या जीवनातील पुस्तके वाचली. इतकेच नव्हे तर शिव्या शिकले. या सर्व अभ्यासामुळे प्रेरणा पाटीलची भूमिका प्रेक्षकांना पटली आहे. या भूमिकेने माझ्या अभिनयाची भूक भागवली आहे.”

माधुरीचे कौतुक करताना प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की, टॅलन्ट हॅज बॉर्न!  माधुरीच्या रुपाने मराठी फिल्म इंडस्ट्रीत नवे टॅलन्ट जन्माला आले आहे. तिने वठविलेली भूमिका इतकी वास्तवदर्शी झाले आहे की, तिच्यासाठी एकदा तरी ‘रानबाजार’ ही वेब सिरिज पाहिलीच पाहिजे.