मधुर भांडारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्प...

मधुर भांडारकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण (Madhur Bhandarkar Enters Marathi Film Industry)

चांदनी बार, फॅशन, पेज ३ अशा अनेक पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी आता मराठी चित्रसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘सर्कीट’ हा मराठी चित्रपट त्यांनी प्रस्तुत केला असून त्याचे दिग्दर्शन आकाश पेंढारकर यांनी केले आहे.

‘सर्कीट’मध्ये वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे ही जोडी आहे. या सिनेमाच्या प्रस्तुतीबाबत मधुर भांडारकर म्हणाले, “मी हिंदी चित्रसृष्टीत काम करत असलो तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी केलेली प्रगती मोठी आहे. त्यामुळे मराठी चित्रपट करण्याची माझी इच्छा होती, ती ‘सर्कीट’ने पूर्ण केली आहे.”

‘सर्कीट’चे दिग्दर्शक आकाश पेंढारकर हे मराठी चित्रपटांच्या घराण्यातून आलेले आहेत. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा तो नातू होय. कच्चा लिंबू, मस्का, भेटली तू पुन्हा, पावनखिंड अशा अनेक मराठी चित्रपटांची प्रस्तुती त्यांनी केली आहे. आता ‘सर्कीट’ द्वारे दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला आहे.