एम. एस. धोनी फेम संदीप नाहरची आत्महत्या : पत्नी...

एम. एस. धोनी फेम संदीप नाहरची आत्महत्या : पत्नीवर केले गंभीर आरोप (‘M.S. Dhoni’ fame Sandeep Nahar commits suicide, serious allegations against wife in suicide note)

सुशांत सिंह राजपूतने ज्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका केली होती, त्याच चित्रपटातील, त्याचा एक सहकलाकार त्याच्याच मार्गाने हे जग सोडून गेला आहे. त्याचं नाव संदीप नाहर. त्याने काल आत्महत्या केली. धोनी मध्ये सुशांत बरोबर आणि केसरी या चित्रपटात संदीपने अक्षयकुमारसोबत काम केलं आहे. त्याने काही टी.व्ही. मालिकांतही काम केलं आहे. ‘कहने को हमसफर है, सीझन ४’ मध्ये त्याने रोनित रॉयचा बेस्ट फ्रेंड म्हणून भूमिका केली होती. ती प्रेक्षकांना आवडली होती.

संदीपने गोरेगावच्या घरी जीवनयात्रा संपविली. त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट व व्हिडिओ टाकून आत्महत्येचा खुलासा केला आहे. त्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की, तो आपल्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हता, त्याला कंटाळून त्याने मृत्युला जवळ केले.
या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

या पत्रातील मजकुराने हे स्पष्ट होत आहे की, तो आपल्या वैवाहिक जीवनात त्रस्त झाला होता. त्यात तो लिहितो- ”आता मला जगण्याची इच्छा राहिली नाही. जीवनात बरीच सुखदुःखं पाहिलीत. अनेक समस्या आल्या. पण आता मी ज्या अवस्थेतून जातो आहे, ती सहनशक्तीच्या पलिकडे आहे.”
मलापण जगायचं होतं, पण या जिण्याला काय अर्थ आहे?

आत्महत्या हा भ्याडपणा आहे, मलाही कळतंय्‌. पण बायको कंचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला समजून घेतलं नाही. तसा प्रयत्न देखील केला नाही.

दररोज क्लेश… सकाळ-संध्याकाळी क्लेश. आता माझी सहनशक्ती संपली. संदीप नाहरच्या सुसाईड नोटमध्ये त्यानं आपल्या बायकोच्या रागीट स्वभावाचं कारण दिलं आहे. तो लिहितो, ”माझी बायको शीघ्रकोपी आहे. तिचा व माझा स्वभाव अगदी वेगळा आहे. आमचं व्यक्तीमत्त्व एकमेकांशी अजिबात जुळत नाही. दररोज क्लेश… सकाळ-संध्याकाळी क्लेश. आता माझी सहनशक्ती संपली. त्यात कंचनची चूक नाही. तिला सर्व नॉर्मल वाटतं. पण माझ्या मते ते नॉर्मल नाही.”
लग्नानंतर समाधान नाही

मुंबईत मी खूप वाईट दिवस पाहिलेत. स्ट्रगल केला. पण त्यात समाधान होतं. आज मी जीवनात खूप काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून जीवन पूर्ण बदललं आहे. लोकांना वरवर वाटतं की, यांचं जीवन कसं छान चाललं आहे. सोशल मीडियावरील आमच्या मजकुराला लोक खरं समजतात. पण ते सगळं खोटं असतं. आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही, हेच खरं आहे.
कंचन मला धमक्या देते, शिव्या देते, जे मला सहन होत नाही

या अभिनेत्याने पुढे असंही लिहिलं आहे की, ”गेल्या दोन वर्षात कंचनने शंभराहून अधिक वेळा आत्महत्या करून तुला अडकवीन, अशी मला धमकी दिलेली आहे. पण हे पाऊल उचलण्याची आज माझ्यावर वेळ आली आहे. ती मला शिव्या देते. माझ्या कुटुंबियांना वाईट शब्द वापरते. मला काहीच मान देत नाही. त्यात तिची काही चूक नाही. कारण ती डोक्याने आजारी आहे. माझ्या पश्चात तिला कोणीच काही बोलू नका. कारण तिला आपण केलेल्या चुकांची जाणीव कधीच व्हायची नाही. तिच्या डोक्याचा मात्र इलाज करा. जेणेकरून मी गेल्यानंतर ती माझ्या कुटुंबियांना अथवा अन्य कोणाला त्रास देणार नाही.”

आपल्या सुसाईड नोटमध्ये संदीपने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. मुलगा म्हणून मी आई-वडिलांसाठी काहीही करू शकलो नाही, याबाबतची खंत त्याने व्यक्त केली.

मुंबईचे पोलिस संदीपच्या आत्महत्येबाबत तपास करीत आहेत. पण लोकांना त्याच्या जाण्याने धक्का बसला आहे. फेसबुक अकाऊंटवर कित्येक लोक त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. दुसरीकडे संदीपचे चाहते त्याची बायको कंचन शर्माला खडे बोल सुनवत आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवर जे फोटो व व्हिडिओ शेअर केलेत त्यावरील कमेंट्‌स पाहा.