संस्कृती जपणारी नायिका आणि आधुनिक नायक यांच्यात...

संस्कृती जपणारी नायिका आणि आधुनिक नायक यांच्यातील संघर्ष आणि प्रेम, नव्या मालिकेत (Love Story With Cultural Clash Is The Theme Of New Marathi Serial)

कलर्स मराठी वाहिनीवर आजपासून ‘भाग्य दिले तू मला’ ही नवी मालिका सुरू होत आहे. तिचे थोडक्यात कथानक असे आहे.

गुहागर येथे लहानाची मोठी झालेली कावेरी भाग्यशाली असं म्हणायला हरकत नाही कारण सावत्र आईचा दुस्वास तिला कधीच सहन करावा लागला नाही. मुळातच सांस्कृतिक चालीरीती, निसर्ग, भाषा आणि आपली माणसं यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि त्यांना अविभाज्य भाग मानणाऱ्या कावेरीचे मन कधीच सिमेंट काँक्रीटच्या घरात लागलं नाही. तर, दुसरीकडे, परंपरा आणि संस्कृती यांना जळमटासारखं झटकून पुढे चालणारा, आताच्या भौतिक सुखांपुढे नाती, प्रेम यांना तुच्छ लेखणारा उद्दाम, मग्रूर, आणि मुळांशी न जोडलेला राजवर्धन म्हणजेच रत्नमाला यांचा मुलगा. ज्याचे म्हणणं आहे, मोठं व्हायचं असेल तर जमीन सोडावी लागते. तसेच परंपरेची कास कधीच न सोडलेल्या, परंपरेचा अभिमान असलेल्या रत्नमाला, ज्यांचे खूप मोठे प्रस्थ आहे, त्या मोठ्या उद्योजिका आहेत… ज्यांचा विश्वास आहे जमिनीवर राहून देखील आकाशापर्यंत गवसणी घालता येते.

उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी रत्नमाला या त्यांच्यासारख्याच संस्कृतीला धरून चालणाऱ्या मुलीच्या शोधात आहेत. आणि याच दरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते. आता, रत्नमाला यांच्या पुढाकाराने राजवर्धन आणि कावेरी एकेमकांना कसे भेटणार ? कसा असेल त्यांचा हा प्रवास ? कशी रंगणार कावेरी आणि राजवर्धनची हळुवार प्रेमाची गोड गोष्ट ते लवकरच कळेल.

या निमित्ताने बोलताना कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख अनिकेत जोशी म्हणाले, “नाविन्यते बरोबरच प्रत्येक मालिका, मालिकेतील पात्र हे मराठी मनाशी व महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले राहील. ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका या बदलाची सुरुवात आहे.”

मालिकेत रत्नमालाची प्रमुख भूमिका निवेदिता सराफ साकारत आहे. त्या म्हणाल्या, “तीन पात्रांभोवती फिरणाऱ्या या कथानकात रत्नमाला या पात्राचे ठाम मत, विचार आहेत. रत्नमालाने स्वबळावर स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. पण मुलगा राजवर्धन वेगळ्या विचारांचा आहे. त्याला सुधारण्यासाठी रत्नमालाला अशी सून हवी आहे, जी तिचंच प्रतिबिंब असेल… दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावत या मालिकेत बघायला मिळेल.”