ज्योतिबाच्या सेटवर चिमुकला पाहुणा (Little Guest...

ज्योतिबाच्या सेटवर चिमुकला पाहुणा (Little Guest Entertain Jyotiba Artistes)

लहान मुलांना टेलिव्हिजन आणि त्यावरील मालिकांचं आकर्षण पूर्वीपासून राहिलं आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनी छोट्या पडद्यावर रंगविलेली पात्रे हा देखील सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरतो. म्हणूनच बव्हंशी मालिकांमधून आधी लहान मुलांच्या पात्रांची रचना करण्याकडे मालिका प्रदर्शित करणाऱ्या चॅनलचा कल असतो आणि मुलांना टी.व्ही. कलाकारांना भेटण्याचे खूप आकर्षण असते.
टी. व्ही. मालिकेच्या अशाच आकर्षणापोटी एक चिमुकला पाहुणा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेच्या सेटवर पोहचला. आणि आपल्या बाललीलांनी तेथील कलावंत-तंत्रज्ञांचे मन रिझवले. ज्योतिबाची मालिका या छोट्या मुलाची आवडती मालिका आहे. त्यामुळे त्याने ज्योतिबा सारखीच वेशभूषा केली होती. या चिमुकल्या पाहुण्याला भेटून सेटवरील कलावंत-तंत्रज्ञ भारावून गेले. स्टार प्रवाह वर चालू असलेल्या या मालिकेत विशाल निकम ज्योतिबाची भूमिका साकारत आहे.

या छोट्या पाहुण्याला पाहून विशालचा आनंद गगनात मावेनासा झाला, ”अशा लहानमोठ्या चाहत्यांमुळे काम करायला नवी ऊर्जा मिळते,” असे सांगून विशाल पुढे म्हणाला, ”आमची मालिका लहान मुलांनाही आवडते, याचा आनंद आहे. सेटवर आलेल्या या चिमुकल्या पाहुण्याला आमच्या मालिकेचं संपूर्ण गीत पाठ होतं. ते त्यानं सर्वांसमोर, न घाबरता म्हणून दाखवलं. प्रेक्षकांचं प्रेम असंच राहो…”