कौशल्याची कामे स्वतःच करा! (Life Skills Every W...

कौशल्याची कामे स्वतःच करा! (Life Skills Every Women Should Learn)

आपल्याकडे गृहिणी ही अष्टावधानी असल्याचं मानलं जातं. घरातील सर्व कामे करण्याचं कौशल्य तिच्याकडे आहे, असं समजून घरातील माणसे, निर्धास्त असतात. अन् कर्तबगार, कुशल गृहिणी देखील तिच्या अंगी चौसष्ट कला असल्यागत ती कौशल्याची कामे पार पाडत असते. नोकरदार महिलांकडे नेमका या कौशल्यांचा अभाव असतो. त्यामुळे बरीच कामे अडतात, खोळंबतात. ती कमावती स्त्री, लहानमोठी कामे बाहेरच्या लोकांकडून करुन घेते. त्यासाठी पैसे खर्च करते. पण तुम्ही नोकरदार असा की गृहिणी; काही कामे जर तुम्ही घरच्या घरी केली तर पैसा वाचेल. अन् त्यासाठी बाहेरच्या लोकांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही.
तेव्हा प्रत्येक महिलेला ही कामे आली पाहिजेत. येत नसतील तर शिकून घेणे योग्य:-
1. दुरुस्ती काम
आपल्या घरात लहानसहान अडचणी उद्भवत असतात. कधी बल्ब वा ट्यूबलाईट बदलायचा असतो. तर कधी बेसिनचा नळ गळत असतो. या गोष्टींसाठी इलेक्ट्रिशियन वा प्लंबर यांच्यावर विसंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः केल्या तर कामे लवकर होतील. भिंतीत खिळा ठोकायचा असेल; खुर्ची-दरवाजाला रंग लावायचा असेल किंवा भिंतीला पडलेली भोके बुजवायची असतील. तर या गोष्टी आपल्याला यायला हव्यात. घरातील विजेचा फ्युज बसविणे देखील यायला पाहिजे. ही कौशल्ये आत्मसात केलीत, तर वेळ आणि पैसा; दोन्ही वाचेल.

2. प्रथमोपचार
भाजी चिरताना हात कापणे, हात भाजणे, मुले धडपडणे, चक्कर येणे इत्यादी बारीकसारीक अपघात होतंच असतात. खेळताना मुले पडतात. त्यांना खरचटतं, रक्त येतं. अशा वेळी घाबरून न जाता त्यावर लगेच मलमपट्टी केली तर जखमा चिघळत नाहीत. त्यासाठी प्रथमोपचार पेटी घरात नेहमीच तयार ठेवा. अन् मुख्य म्हणजे प्रथमोपचार आधी शिकून घ्या. म्हणजे कोणत्या दुखण्यावर कोणते औषध लावावे, ते लक्षात येईल. बॅन्डेज, चिकटपट्टी, आयोडिन, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम, स्प्रे, मलम, कापूस ही उपचाराची साधने हाताशी ठेवा. म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. यामध्ये हार्ट अटॅक, पक्षाघाताचा झटका, उष्माघात इत्यादी झाल्यास प्रथम काय उपचार करावेत. लगोलग कोणती औषधे घ्यावीत, त्याचीही माहिती करून घ्या.
3. वाहनाची देखभाल
आजकाल प्रत्येक घरात दुचाकी किंवा चार चाकी वाहन आढळून येते. वाहन असणे हे आता श्रीमंतीचं लक्षण राहिलं नसून गरजेची वस्तू बनली आहे. या दुचाकी वाहनामध्ये किरकोळ नादुरुस्ती होत राहतात. प्लग बिघडणे, टायर पंक्चर, रेडिएटरमधील पाणी व कूलंट कमी होणे, वायपर्स बदलणे, इंजिन ऑईल – ब्रेक ऑईल बदलणे – अशी कामे त्यामध्ये निघतात. ही कामे आपल्याला करता आली पाहिजे. त्यामध्ये कौशल्य आहे, पण ते फार जटिल नाही. शिवाय वाहन दररोज साफ केले पाहिजे. ही किंवा तत्सम कामे; आपल्या वाहनाच्या बाबतीत आपण करु शकलो तर आपला बराचसा वेळ आणि पैसा वाचेल.

4. आर्थिक व्यवहार
बव्हंशी महिला आर्थिक व्यवहार- जसे की बँकेचे व्यवहार, विमा पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स याबाबत आपल्या जोडीदारावर अवलंबून राहतात. या व्यवहारात सुरुवातीपासूनच लक्ष घालून त्याची कार्यप्रणाली शिकून घेतली पाहिजे. बँकेत पैसे भरणे-काढणे, पासबुक एन्ट्री करणे, मुदत ठेवीचे नूतनीकरण, त्यामध्ये पैसे गुंतविणे किंवा विमा अथवा आरोग्य विमा काढणे व त्यांचे नियमित नूतनीकरण करणे. त्या विम्यांचा, आजारपणासाठी उपयोग करायचा झाल्यास त्याची प्रक्रिया समजावून घेणे; इत्यादी बाबी आपण स्वतंत्रपणे हाताळू शकलो पाहिजे. म्हणजे कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.