परफ्यूम एटिकेट्स (Let’s Know What Are The Perfu...

परफ्यूम एटिकेट्स (Let’s Know What Are The Perfume Etiquette)

परफ्यूम एटिकेट्स… अर्थात परफ्यूम वापरण्याबाबतचा शिष्टाचार?… ही काय भानगड आहे?… हा सवाल कुणालाही पडेल. आपल्या आवडीच्या सुगंधाचा परफ्यूम निवडायचा आणि घराबाहेर पडताना तो कपड्यांवर शिंपडायचा… एवढाच काय तो आपला आणि परफ्यूमचा संबंध… नाही का? आता त्यात कसला शिष्टाचार पाळायचा?… पण हे एवढंच नाही. परफ्यूमचा वापर करताना काही गोष्टी लक्षात घेतल्याच पाहिजेत. त्याविषयी जाणून घेऊ-
परफ्यूम कुठे लावावं?
बर्‍याच लोकांची अशी तक्रार असते की, महागडा परफ्यूम घेऊनही त्याचा सुगंध अधिक काळ टिकत नाही. खरं तर, यासाठी परफ्यूम जबाबदार नसतो, तर परफ्यूम लावण्याची आपली चुकलेली पद्धत त्यासाठी जबाबदार असते. परफ्यूम योग्य ठिकाणी लावला नाही, तर त्याचा सुगंध अधिक काळ टिकत नाही.
– परफ्यूम नेहमी शरीरावरील पल्स पॉइंट्स, अर्थात जिथे रक्तवाहिन्यांचे ठोके लागतात, तिथेच लावा. हे पल्स पॉइंट्स मिनी पम्पप्रमाणे काम करतात. म्हणजेच या ठोक्यांसह परफ्यूमचा सुगंध चहूकडे पसरतो.
– दोन्ही हातांचे मनगट, दोन्ही कानांच्या मागच्या बाजूस, गळ्याच्या मध्यभागी असलेला विंड पाइप आणि दोन्ही हातांच्या कोपर्‍याच्या पुढच्या बाजूस परफ्यूम लावा.
– मनगटावर परफ्यूम लावल्यावर ते एकमेकांवर चोळू नका, यामुळे परफ्यूमचा परिणाम कमी होईल.

योग्य परफ्यूमची निवड
ठिकाण किंवा प्रसंगाच्या अनुरूप योग्य परफ्यूमची निवड करायला हवी.
– ऑफिस, सेमिनार, ऑफिशिअल कार्यक्रम अशा प्रसंगांसाठी सौम्य सुगंधाचा परफ्यूम वापरा, म्हणजे तुमच्या परफ्यूमच्या सुगंधाने सहकार्‍यांना त्रास होणार नाही.
– संध्याकाळची पार्टी, कॉकटेल पार्टी, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा लग्नसमारंभाला जात असाल, तर उग्र सुगंधाचा परफ्यूम वापरण्यास हरकत नाही. तसंच प्रसंग अगदीच खास असेल, तर एखादा सिग्नेचर परफ्यूमही वापरता येईल. म्हणजे, या सिग्नेचर परफ्यूमच्या सुगंधाने तुमच्या मित्रमंडळींना किंवा आप्तेष्टांना तुमची चाहूल लागेल.
– परफ्यूमची निवड करताना ऋतूचंही भान ठेवायला हवं. म्हणजे उन्हाळ्यात सौम्य सुगंधाची, तर हिवाळ्यात उग्र सुगंधाची निवड करता येईल.

परफ्यूमचं प्रमाण
काही लोकांना परफ्यूमने अंघोळ करायची सवय असते. ते आपल्या संपूर्ण कपड्यांवर, अगदी केसांवरही परफ्यूमचा फवारा मारतात. त्यांना असं वाटतं की, जितका जास्त परफ्यूम लावू, तितका अधिक वेळ तो टिकून राहील. मात्र असं काही नाही. परफ्यूम केवळ आपल्या पल्स पॉइंट्सवर आणि तेही एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा स्प्रे करा.
ऑलराउंड परफ्यूम
हल्ली ऑलराउंड परफ्यूम्सची चलती आहे. हे परफ्यूम तुम्ही थेट शरीरावर किंवा कपड्यांवरही फवारू शकता. अनेक ब्रँडेड कंपन्यांनी आपले ऑलराउंड परफ्यूम बाजारात आणले आहेत. या परफ्यूमच्या वापराने शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही आणि कपड्यांवर डागही लागत नाहीत.

यूनिसेक्स परफ्यूम
सध्या यूनिसेक्स परफ्यूम्सही अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. म्हणजे घरातील स्त्री-पुरुष दोघंही एकाच परफ्यूमचा वापर करू शकतात.
सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा
परफ्यूमवर थेट सूर्यप्रकाश येणार नाही, याची दक्षता घ्या. थेट सूर्यप्रकाशामुळे परफ्यूमचा परिणाम कमी होतो. तसंच परफ्यूम खूप काळ सांभाळून ठेवू नका. शक्य तितक्या लवकर ते संपवा. परफ्यूमवरील पॅकिंग डेटच्या पाच वर्षांमध्ये ते वापरून घ्या.
बायो परफ्यूम
सध्या बायो परफ्यूम्सचा ट्रेंडही वाढतो आहे.
नावाच्या अनुरूप या परफ्यूममध्ये वापरण्यात येणारे 95 टक्के घटक शुद्ध आणि नैसर्गिक असतात. हे परफ्यूम इको फ्रेंडली तर असतातच, मात्र त्वचेसाठीही सुरक्षित असतात. इतर बायो प्रॉडक्ट्सप्रमाणेच हे परफ्यूमही अतिशय महागडे असतात.

प्राण्यांवर चाचणी केलेले परफ्यूम
अनेक कॉस्मेटिक कंपन्या आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कोणतंही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी, त्याची चाचणी प्राण्यांवर करतात. ही पूर्ण प्रक्रिया अतिशय वेदनादायक असते. तसंच ही चाचणी करताना प्राण्यांना कोणत्याही प्रकारचं पेनकिलरही दिलं जात नाही. म्हणून शक्यतोवर अ‍ॅनिमल टेस्टेड परफ्यूम वापरणं टाळा. तेव्हा पुढच्या वेळी परफ्यूम खरेदी करताना आणि वापरतानाही या गोष्टी जरूर लक्षात घ्या, म्हणजे सुगंधाचा आनंद तुम्हाला आणि इतरांनाही उपभोगता येईल.