सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाच्या समारंभातील सत्का...

सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाच्या समारंभातील सत्कारमूर्ती लियो कल्याणने लोकांनी केलेल्या निंदानालस्तीस दिले उत्तर, म्हणाला, हे फक्त कपडे आहेत, नजरेचा फरक आहे, जग पुढे गेलं आहे! (Leo Kalyan, Who Performed At Sonam Kapoor’s Baby Shower, Reacts To Hate Comments, They’re Just Clothes. It’s All About Perspective, Educate Yourself)

अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या फक्त आणि फक्त तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. नुकतेच लंडन येथे तिचे डोहाळे जेवण (Baby Shower) त्यांना शोभेलशा थाटामाटात पार पडले. या डोहाळे जेवणाचे फोटोही व्हायरल झाले. या फोटोंमध्ये डेकोरेशनचे फोटो होतेच तसेच डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आलेल्या गायक लियो कल्याणचे (Singer Leo Kalyan) सोनम कपूरसोबतचे फोटोही  पाहायला मिळाले. त्या दिवसापासून या फोटोंमध्ये सोनमसोबत दिसलेल्या लियोची जोरदार चर्चा रंगली आहे. लिओला त्याच्या अवतारावरून नेटकऱ्यांनी फारच वाईट शब्दांत ट्रोल केले आहे.

सोनमच्या डोहाळे जेवणाच्या समारंभामध्ये लियोने मसकल्ली हे गाणे गायले होते, तसेच त्याने चुरा लिया है तुमने जो दिल को… हे गाणं गाऊन मैफीलीची रंगत वाढवली. समारंभामध्ये लियोच्या मधुर आवाजाने सगळ्या पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. सोनम आणि इतर पाहूणे त्याच्या गाण्यांवर डोलताना दिसले होते.

या समारंभामध्ये लियोने सोनमसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअरही केला. परंतु त्या फोटोमधील सोनमकडे न पाहता तिच्यासोबत वनपिसमध्ये आलेल्या लियोच्या दाढी-मिशीतील लूक्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. लियोने या खास दिनासाठी शॉर्ट शिमरी स्ट्रैपी ड्रेस घातला होता आणि त्याचे खांद्यापर्यंत आलेले केस भुरभुरत होते. त्याचा असा हा अवतार पाहिल्यानंतर लोकांनी त्याची वाईट शब्दांत निंदा केली. 

कोणी म्हटले की सोनमसोबत हा दाढी-मिशी असलेला मायावी राक्षस कोण आहे? तर कोणी म्हटलं की सोनमला असंच मूल झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकांनी हा कोणता प्राणी आहे, सोनमने हे कोणाला बोलावले? असाही टोला मारला. अन्‌ काहींनी तर हद्द केली. म्हणाले, अजून मूल झालं नाही, अन्‌ नाचणारे आधीच पैसे मागायला आले…

लोकांच्या अशा घृणास्पद प्रतिक्रियांवर आता लियोने प्रतिउत्तर दिले आहे. त्याने म्हटलंय की, फोटो शेअर केल्यानंतर त्याला बऱ्याच तिरस्कारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. लियोने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक नोट शेअर केली आहे ज्यात त्याने लिहिलंय – “अशाप्रकारच्या घृणास्पद प्रतिक्रियांनी मला अजिबात त्रास होत नाही. कारण त्यापैकी काही टीका मजेदार आहेत. त्या मी माझ्या मित्रांसोबत शेअर करतो आणि त्या वाचून आम्ही खूप हसतो. लोकांच्या अशा निंदानालस्तीमुळे, मी माझ्या पद्धतीने अगदी मला हवं तसं जीवन जगत आहे, याची मला खात्री होते. वास्तवात हे लोक आणि सामाजिक परिमाणांना मी आव्हान करत आहे, म्हणजेच – मी योग्य तेच करत आहे.”

लियो कल्याण हा एक ब्रिटिश पाकिस्तानी गायक आहे. तसंच तो गीतकार, संगीतकार आणि प्रोफेशनल मॉडेल देखील आहे. आपल्या आवाजाच्या जादूनं लोकांना मंत्रमुग्ध करणारा लियो अशी त्याची ओळख आहे. चाहते लियोने त्यांच्या आवडीचं गाणं गाऊन सोशल मीडियावर पोस्ट करावं, अशी मागणी करतात. असे असूनही काही लोक मात्र त्याच्या कलेची प्रशंसा करायचे सोडून त्याच्या दिसण्यावर टीका करतात, हे लज्जास्पद आहे.

लियोने त्याच्या इन्स्टास्टोरी आणि ट्विटरवर काही पोशाखांचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलंय – हे केवळ कपडे आहेत, ज्यांचे काळानुसार वेगवेगळे संदर्भ आहेत. आपला दृष्टिकोन बदला, स्वतःला शिक्षित करा कारण आता जग बदललं आहे, विकसित झालं आहे.