‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंह यांचे निध...

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंह यांचे निधन : असा आहे त्यांचा खडतर संघर्ष (Legendary Indian Sprinter Milkha Singh Passed Away, Read The Struggle Story Of Flying Sikh)

भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २० मे २०२१ रोजी मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण काल रात्री चंदीगड येथील पीजीआई रुग्णालयात मिल्खा सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊयात त्यांच्या जीवनातील खडतर संघर्षाशी निगडीत काही गोष्टी.

जे नशीबाच्या भरवशावर राहतात, ते कधी यशस्वी होत नाहीत – मिल्खा सिंह

”हातांवरील रेषांनी जीवन घडत नाही, आपल्याही सहभाग आहे… ते घडविण्यामध्ये… ”

केवळ नशीबावर अवलंबून राहणाऱ्या लोकांना कधीही यशस्वी होता येत नाही. मिल्खा सिंह यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये असे म्हटले होते. यावरून मिल्खा सिंह यांना यशस्वीतेचं शिखर गाठण्याकरिता किती खडतर संघर्ष करावा लागला, किती कष्ट करावे लागले असतील, हे लक्षात येते.

फाळणीनंतर आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणींना गमावले

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. त्यांच्या आई-वडिलांना १५ अपत्यं झाली, त्यापैकी ते एक होते. त्यांची काही भावंडं लहानपणीच वारली. लहानपणीच भारत-पाकिस्तान फाळणी आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावण्याचे दुःख त्यांना कायम सलत राहिले. फाळणी दरम्यान उसळलेल्या दंगलीत त्यांनी आपले आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणींना डोळ्यांसमोर जळताना पाहिले.

खायला जेवण मिळावं म्हणून ढाब्यावर भांडी घासली

समोर मृत्यू दिसत असताना भळभळत्या जखमा घेऊन मिल्खा सिंह यांनी महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे दिल्ली गाठली. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, फाळणीनंतर ते जेव्हा दिल्लीला पोहोचले, तेथे दिल्लीच्या जुन्या रेल्वे स्टेशनवर अनेक जण मृत्यूमुखी पडलेले त्यांनी पाहिले. चहुकडे रक्ताचे सडे होते. त्यावेळी पहिल्यांदा ते रडले होते. दिल्लीला गेल्यानंतर ते निर्वासित छावणीमध्ये राहिले. तेथेच रेल्वे स्टेशनच्या समोर फुटपाथवर असलेल्या ढाब्यामध्ये पोटाची भूक भागावी याकरिता भांडी घासू लागले. दिल्लीमध्ये राहत असलेल्या आपल्या बहिणीच्या सासरी काही दिवस ते राहिले.

सैन्यात दाखल झाले

इतक्या खडतर परिस्थितीत दिवस घालविल्यानंतरही मिल्खा सिंह यांनी जीवनात काहीतरी करून दाखविण्याचा निर्णय घेतला. भाऊ मलखान सिंह याच्या सांगण्यावरून त्यांनी सेनादलात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि चौथ्यांदा प्रयत्न केल्यानंतर १९५१ साली ते सैन्यात भरती झाले. सेनादलात सामील झाल्यानंतर क्रॉस कंट्री रेसमध्ये ते सहाव्या क्रमांकावर आले. या सफलतेनंतर सेनेने त्यांची खेळांच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड केली,

अशी मिळाली ‘फ्लाइंग सिख’ उपाधी

मिल्खा सिंह यांना ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधि मिळाली होती. ही नवी ओळख त्यांना कशी मिळाली याचा मजेशीर किस्सा आहे. १९६० साली मिल्खा सिंह यांना पाकिस्तानात ॲथलेटिक्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली, परंतु ज्या देशात आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आली तेथे जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. मात्र पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर मिल्खा सिंग यांना जावं लागलं. तेथे एशियाच्या सर्वात वेगवान धावपटू अब्दुल खालिक यांच्याशी त्यांचा सामना होता. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खाला पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाइंग शिख’ ही उपाधी दिली.

मिल्खा सिंह यांचे विक्रम

१९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये भारत सरकारद्वारे त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता, परंतु मिल्खा सिंह यांनी हा पुरस्कार नाकारला होता.

शेवटची इच्छा राहिली अपूर्ण

आपल्या ८० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ७७ सामने त्यांनी जिंकले, परंतु रोम ऑलिम्पिकमध्ये एका सेकंदाने त्यांचे कांस्यपदक हुकले, ज्याची सल त्यांच्या जीवनात कायम राहिली. जिवंत असेपर्यंत एका तरी भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक जिंकावी, अशी त्यांची इच्छा होती, जी अपूर्णच राहिली. महान धावपटू मिल्खा सिंग यांचा हा खडतर संघर्ष प्रेरणादायी तर आहेच प्रत्येकाच्या मनाला हळवा करणाराही…

मिल्खा सिंग यांच्या मृत्यूची बातमी कळताच देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. मिल्खा सिंग यांचा जीवनपट पडद्यावरही आलेला आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून त्यांचा जीवनपट मांडण्यात आलेला आहे. या सिनेमात फरहान अख्तरने त्यांची भूमिका साकारलेली आहे. बॉलिवूडमधील अभिनेता फरहान अख्तर याने देखील एक पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलंय. फरहानने मिल्खा सिंग यांची बायोपिक असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली होती.