लर्निंग-अर्निंग टाइम (Learning And Earning Oppo...

लर्निंग-अर्निंग टाइम (Learning And Earning Opportunities For Woman)

उन्हाळ्याच्या मोठ्ठ्या सुट्टीत खेळण्या-बागडण्याइतकंच पार्ट टाइम जॉब करण्याची कल्पना भन्नाट आणि प्रशंसनीय आहे. आम्ही अनेक पर्याय सुचविले आहेत. त्वरा करा, मुदत फक्त उन्हाळ्यापुरतीच…!
उन्हाळा म्हटलं की सुट्टी. त्यामुळे वर्षभर अभ्यासाला बांधलेली शाळा-कॉलेजातील मुलं अक्षरशः मोकाट सुटतात. परीक्षांचं टाइमटेबल मिळाल्या दिवसापासूनच पुढे येणार्‍या सुट्टीत काय करायचं याचं नियोजन झालेलं असतं. आवडीचा छंद जोपासण्यासाठी, त्यात काहीतरी करून दाखविण्यासाठी उन्हाळ्यातील ही सुट्टी फार कामी येते. उन्हाळ्याच्या सुट्टीचा जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा काळ असतो. दहावी-बारावीची मुलं देखील नंतर नंतर सुट्टीत कंटाळतात, तेव्हा सुट्टीचा हा काळ सार्थकी लागावा यासाठी पालक मुलांना सुट्टीमध्ये त्यांच्या आवडीनुसार कोर्सेसना पाठवतात. त्यामुळे काय होतं तर मुलांना, तरुणांना शाळा-कॉलेज चालू असताना जे शिकता येत नाही, करता येत नाही, ते या सुट्टीत त्यांना शिकायला, करायला मिळतं. तसंच एरव्ही ज्या गृहिणींना कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे पात्रता असूनही आपल्यातील कौशल्य दाखविण्यास वाव मिळत नाहीत, त्यांनाही या सुट्ट्या कॅश करता येतात. या कालावधीत स्वतःच्या आवडीनुसार काम करून पैसा मिळविण्याची संधी सगळ्यांना मिळू शकते. तेव्हा या मोसमास आपण ‘लर्निंग-अर्निंग’ टाइम असं म्हणू शकतो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळण्या-बागडण्याइतकंच पार्ट टाइम जॉब करण्याची कल्पना अगदी प्रशंसनीय आहे. यामुळे मुलांना पैसे कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याची जाणीव होतेच आणि काम करता करता अनेक गोष्टीही शिकता येतात. गृहिणींनादेखील रोजगाराची संधी मिळून चार पैसे गाठीशी ठेवता येतात. करणार्‍याला रोजगार भरपूर आहेत. बघा तुम्हाला काय करायचंय?

पोहणे


तुम्हाला चांगलं पोहता येतंय आणि पोहण्याची आवडही आहे. तर मग तुम्ही लहान मुलांना पोहायला शिकवून आपली आवड रोजगारात बदलू शकता. पोहण्यासारखा उत्तम व्यायाम नसल्यामुळे मुला-मुलींना पोहायला शिकवण्यासाठी पाठविणार्‍या पालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. सुट्टीच्या दिवसांत त्यांच्या सर्व बॅचेस भरलेल्या असतात. सीआरपी आणि लाइफगार्डचं प्रशिक्षण घेतलं असल्यास लाइफगार्ड म्हणूनही नोकरी करता येते. अर्थात याचे पैसेही मिळणार.

फोटोग्राफी
हल्ली तर आपण बघतो, बहुतांशी लोक मोबाईलवर बोलतात कमी आणि सेल्फी जास्त काढतात. रोजच्या रोज तयार झाल्यानंतर स्वतःचा फोटो काढण्याची आवड असणारे असतात. रोजच्या कौटुंबिक उत्सवप्रसंगी आपण स्वतःच मोबाईलच्या कॅमेर्‍यामधून फोटो काढून आपली फोटोग्राफीची हौस भागवतो. परंतु सुट्टीमध्ये प्रत्यक्ष कॅमेरा हातात घेऊन तुम्ही लग्न समारंभ, बारसं, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमात फोटोग्राफी करून पैसे कमवू शकता. आवड म्हणून तुम्ही काही छान फोटो काढले असतील तर ते फोटो एजन्सींना किंवा फोटोंच्या वेबसाइट्सना विकू शकता. त्यांना फोटो आवडल्यास तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळू शकतात. तेव्हा अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा आपली फोटोग्राफी सिद्ध करा नि पैसेही कमवा.

फ्रीलांस लेखन


फ्रीलांस लेखन करण्याची आवड आहे आणि तुमचं लेखन लोकांना वाचायला आवडतंय, तर या सुट्टीत तुम्ही फ्रीलांस लेखक व्हाच. घरबसल्या आपल्या आवडीच्या विषयावर लेख लिहून वर्तमानपत्र, मासिक वगैरे ठिकाणी तुम्ही ते पाठवू शकता. असं केल्यास पैसे आणि प्रसिद्धी दोन्ही मिळेल.

पुस्तक लिहा
स्वतःचं पुस्तक लिहा. पैसे कमवा. आता तरुण मंडळीही आपल्या उत्तम लेखनाने कमी वयात प्रसिद्धी मिळवतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर पुस्तक लिहा. तुमचं लेखन वाचकांना आवडल्यास तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळेल शिवाय नावही होईल. पुस्तक लिहायचं नसल्यास ब्लॉग्स लिहा. सध्या ब्लॉगर्सनाही सेलिब्रेटींइतकाच मान आहे. वाचकांना तुमचं लिखाण आवडलं तर तुम्ही त्यांचे चांगले मार्गदर्शक बनू शकता. आवडीचं काम करताना आपण उत्साही असतो. तेव्हा पैसे आणि प्रसिद्धी दोन्हींसाठी या सुट्टीत लिहिते व्हा.

युट्यूबर


तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल विस्तृतपणे माहिती असल्यास त्यासंबंधीचा व्हिडिओ युट्यूबवर टाकून युट्यूबर बना आणि कमी वेळेत जास्त नफा कमवा. सर्वात आधी तुम्हाला युट्यूबर जो व्हिडिओ टाकायचा आहे, त्यासंबंधीत विषयाची निवड करा. तो कसा सादर करायचा याची व्यवस्थित तयारी करा. जसे – विनोद, सिनेमा, पाककृती, राजकीय, सामाजिक इत्यादी. जर तुमचे व्हिडिओज् लोकांच्या पसंतीस उतरले तर लवकरच आपण युट्यूबर होऊन चांगले पैसे कमवाल.

ब्रँड मेंबर
गाणं लिहिण्याची किंवा संगीत दिग्दर्शन करण्याची इच्छा असणार्‍या मंडळींनी एखाद्या ब्रँडशी संपर्क साधावा. अमुक एका ब्रँडचे मेंबर झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमातून कला सादर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. प्रसिद्ध ब्रँड असल्यास तुमच्या सादरीकरणासाठी चांगली दाद आणि उत्तम मिळकतही दिली जाईल.

इव्हेंट ऑर्गनायजर
ज्यांना भटकंती करावयास आवडते, त्यांनी सुट्टीमध्ये इव्हेंट ऑर्गनायजर म्हणून काम करावयास हवे. सुट्ट्यांच्या दिवसात मोठमोठ्या इव्हेंट ऑर्गनायजर्सना असिस्टंटची गरज असते. या ऑर्गनायजर्सची माहिती ऑनलाइन मिळवता येते. त्यांच्याशी संपर्क साधून तेथे तुम्ही काम केल्यास काही नवीन गोष्टी शिकता येतील. व्यक्तिमत्त्व विकास होईल आणि पैसे तर मिळतीलच.

मॉडेलिंग


फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करणार्‍या मॉडेल्सना पाहिलं की त्यांचा हेवा वाटतो. छान छान कपडे घालायचे, सुंदर दिसायचं, नखर्‍यात चालायचं… एकदम टॉप! नटण्या-मुरडण्याची आवड असणार्‍या मुलींवर मॉडेलिंगची ही जादू चढल्याशिवाय राहत नाही. मॉडेलिंगसाठी सुंदर दिसणं आणि परफेक्ट व्यक्तिमत्त्व असणं अशी पात्रता लागते. हल्ली पार्ट टाइम बेसिसवर नवनवीन मॉडेल्सना काम दिलं जातं. तेव्हा इंटरनेटवरून काही एजन्सीचे नंबर काढा. मन लावून काम करा. या क्षेत्रात यश मिळविणं हे सोपी गोष्ट नाही. परंतु ते मिळाल्यानंतर तुमची ओळख लपून राहू शकत नाही. शिवाय पैसेही मिळतात.

कॉल सेंटर


मातृभाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या व्यक्तींना कॉल सेंटरमध्ये सहज नोकरी मिळते. येथे सतत बोलायचं तसंच समोरच्या व्यक्तीला आपला मुद्दा पटवून द्यायचा असतो. त्यामुळे येथे काम करणार्‍या व्यक्तींचे संवादाचं कौशल्य अधिक विकसित होतं. याचा भविष्यातही त्यांना नक्की उपयोग होतो.

ग्रंथालय
वाचनाची आवड असेल तर ग्रंथालयामध्ये नोकरी करा. येथे बसल्या बसल्या अनेक लोकांच्या तुम्ही संपर्कात याल. तसेच विविध विषयांची, भाषांची, देशोदेशींची पुस्तकं तुम्हाला येथे वाचता येतील. ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. शिवाय अभ्यास करता करता कमाईदेखील होईल.

फिटनेस इंस्ट्रक्टर
आरोग्याबाबत दक्ष असणार्‍या व्यक्तींना दररोज व्यायामाची सवय असते. त्यांनी दुसर्‍यांनाही ही चांगली सवय लावण्याचा निर्धार करावा. त्यासाठी फिटनेस इंस्ट्रक्टर म्हणून जिममध्ये पार्ट टाइम नोकरी करता येऊ शकेल. एखाद्या चांगल्या जिममध्ये हा जॉब करून तुम्ही फिटनेस आणि इन्कम दोन्ही मिळवू शकता. जिममध्ये मोठमोठ्या प्रशिक्षकांना हेल्पर किंवा असिस्टंट हवे असतात. हा जॉब कॉलेज चालू झाल्यानंतरही सुरू ठेवता येण्याजोगा आहे.

रिटेल जॉब
जागोजागी दिसणार्‍या मॉलमध्ये सुट्टीच्या दिवसात कॉलेजातील विद्यार्थी दिसणं आता नवीन नाही. कारण या विद्यार्थी वर्गाला रिटेल जॉब करण्याविषयीचं आकर्षण असतं. अभ्यासाबरोबरच मॉलमध्ये येणार्‍या तर्‍हतर्‍हेच्या व्यक्तींशी आदरानं बोलून त्यांना वस्तू घेण्यासाठी पटवावं लागतं. यासाठी कधीकधी संयमही पाळावा लागतो. तरीही मुलं हे काम अतिशय चोखपणे करतात.

अभ्यासाची शिकवणी किंवा छंदवर्ग
घराबाहेर पडून काही करावसं वाटत नसेल त्यांनी घरीच मुलांची शिकवणी घ्यावी. अर्थात अभ्यासाचीच नव्हे तर अन्य कला अवगत असल्यास चित्रकला, हस्तकला, पाककला इत्यादी छंद वर्गही तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता.

अभिनय, नृत्याचे वर्ग


ज्या विषयात प्रावीण्य असेल त्याप्रमाणे रोजगाराची निवड करणं तुमच्या हातात आहे. सध्या रिअ‍ॅलीटी शोज मुळे अभिनय, नृत्य, गाणं शिकण्याकडे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा कल दिसून येतो. तेव्हा आपल्याकडे असलेली कला दुसर्‍यांना द्या. त्यासाठी क्लासेस घ्या नि पैसेही मिळवा.

मार्केटिंग
एखादी गोष्ट गोड गोड बोलून दुसर्‍याला पटवून देता येत असेल. तर तुम्ही मार्केटिंगचा जॉब उत्तम करणार. या क्षेत्रात चांगलं काम करणार्‍या व्यक्तीस वेतनासह कमिशनही मिळतं. नोकरी करणार्‍या व्यक्तीही मार्केटिंगचा पार्ट टाइम जॉब करतात.

टूर गाइड
आजकाल ट्रॅव्हल एजन्सीज नुकतेच पदवीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अनुभवासाठी आपल्याकडे जॉब देतात. त्यासाठी दोन-तीन दिवस त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. फिरण्याची आवड असणार्‍या किशोरवयीनांसाठी ही खरं तर नामी संधी आहे. येथे त्यांना पगार तर मिळतोच शिवाय फिरायलाही मिळतं. फिरण्यातून अनेक नवनवीन गोष्टी कळतात.

इंटर्नशीप करा
ज्या कामाची आवड आहे त्याच्याशी संबंधित कंपनीमध्ये इंटर्नशीप करूनही आपण पैसे कमवू शकता. यामुळे आपल्याला कामाचं स्वरूप समजेल आणि पुढे करिअरसाठी तयार राहता येईल.
बघा वेळ अतिशय महत्त्वाची आहे. मोसम अजून सुरू व्हायचाय. आम्ही तुमच्यापुढे अनेक पर्याय ठेवले आहेत. त्यापैकी तुमच्या आवडीचा पर्याय निवडा नि लागा कामाला…!