शिकून घ्या प्रेमाची भाषा (Learn the technique o...

शिकून घ्या प्रेमाची भाषा (Learn the technique of Love)

नाती ही प्रेमाने, आपुलकीने आणि समंजसपणाने बांधून ठेवली की ती फुलतात, बहरतात, परंतु बरेचदा नात्यांना गृहीतच धरले जाते. त्यामुळे नात्याकडे दुर्लक्ष होऊन ती कोमेजतात. पती पत्नीने आपल्यातील नातं सदा टवटवीत ठेवण्यासाठी त्याची प्रेमाने, आदराने जोपासना करायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने प्रेमाची भाषा घेतली पाहिजे.

कॉम्लीमेंट्स द्या:- बरेचदा आपण आपल्याला जे काही वाटते ते बोलून न दाखविता मनात ठेवतो. आपल्या जोडीदाराबद्दल जे काही तुम्ही अनुभवता, ते त्यास सांगा. एखाद्या दिवशी तुमचा जोडीदार जरा वेगळा दिसत आहे किंवा एखादा रंग त्याला खुलून दिसत आहे तर त्यासाठी त्याला नक्की कॉम्लीमेंट्स द्या. तुला हा रंग खूप छान दिसतोय किंवा या केशरचनेमध्ये तू फारच संदर दिसतेस, असे बोलल्याने दोघांमधील नाते अधिक मजबूत बनेल.

 वागणुकीतून प्रेम आणि काळजी दाखवा :- आपल्या जोडीदारास त्याच्या आवडीचा पदार्थ करुन खिलवा किंवा एखादे सरप्राईज गिफ्ट द्या. काही वेळा शब्दांपेक्षा आपली वागणूकही नात्यांची गोफ घट्ट बनविते. नवर्‍यानेही कधीतरी बायकोच्या कपड्यांना इस्त्री करुन द्यावी. कधी तिच्यासाठी गजरा आणावा. नाहीतर कधी तिला घरच्या कामात मदत करावी. अशा प्रकारच्या वागणुकीतून एकमेकांबद्दलचे प्रेम वा काळजी आपोआप प्रदर्शित होते, ती बोलून दाखवावी लागत नाही.

 क्वालीटी टाईम :- सध्या नवरा-बायको दोघंही नोकरी-व्यवसायामुळे व्यस्त असतात. त्यामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. परंतु ते जेवढा वेळ एकमेकांसोबत असतात, तो वेळ त्यांनी मजेत घालविला पाहिजे. कधी ऑफिसमधून लवकर घरी येऊन घरीच डिनर प्लॅन करा. कधी सिनेमा बघायला किंवा लाँग ड्राईव्हला जा. हे शक्य झाले नाही तर विकेंडला सोबत राहता येईल असे काहीतरी योजा. बाहेर फिरावयास जाण्याचे ठरवत असाल तर तेथे तुम्ही दोघंच असाल याची काळजी घ्या. तेथे दोहोंनीही ऑफिसमधील गप्पा मारायच्या नाहीत. कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलावयाचं नाही. दिवसभर फोन वा लॅपटॉपला चिकटून तर बिलकूलच राहायचं नाही. एकमेंकांना समजून घ्या, मनानं एकत्र या.

 भेटवस्तू न बोलता भावना पोहोचवितात :- प्रेम दर्शविण्याकरीता गुलाबाचं एक फुलही परिणामकारक ठरतं, त्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही. जोडीदाराच्या आवडीचं आईस्क्रीम वा मिठाई घरी न्या, नाहीतर घरीच आवडीचं काही बनवा. जोडीदाराची आवड आणि आपली कुवत पाहून वेळोवेळी भेटवस्तू देत राहा आणि प्रेम दर्शवित राहा. कारण नुसतं प्रेम करुन चालतनाही, तर अधून मधून ते दर्शवावं देखील लागतं.

 भावना व्यक्त करण्यासाठी शारीरिक सहभागही हवा :- एकमेकांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, काळजी आहे, परंतु नवरा बायकोच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमळ स्पर्शही तितकाच महत्वाचा आहे. या नात्यामध्ये मनाप्रमाणे शरीराचाही सहभाग अभिप्रेत आहे. सोबत असताना जोडीदाराचा हात हातात घ्या. ओठांनी त्यास स्पर्श करा, प्रेमाने मिठीत घ्या. चुंबन हे मोठमोठ्या प्रेमाच्या बोलांपेक्षा अधिक प्रभावी असतं. स्पर्श गरजेचा आहे. कधी तणावात असताना प्रेमाचा हळूवार स्पर्श खूप मोठं बळ देतो. तेव्हा प्रेमाचा पाठीवरुन फिरणारा हात नात्यामध्ये आपण एकमेकांच्या सुखदु:खात सारखेच सामील आहोत, ही भावना न बोलता स्पर्शाने व्यक्त करा.