मराठी मालिकेत कोहिनूर (Kohinoor Appears in Mara...

मराठी मालिकेत कोहिनूर (Kohinoor Appears in Marathi Serial)

कोहिनूर हे नाव घेतलं की, आपल्याला कोहिनूर हिरा आठवतो. या अनमोल रत्नाचा महिमाच असा आहे की, तो भारतीयांच्या स्मृतीतून जात नाही. आता या नावाचा एक पांढरा शुभ्र घोडा चर्चेत आला आहे. हा घोडा स्टार प्रवाह वरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या पौराणिक मालिकेत दिसत आहे. ज्योतिबाचा ‘उन्मेष’ नावाचा घोडा होता. ती भूमिका कोहिनूर घोड्याने साकारली आहे. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा आपण ऐकल्या असतील. पण हा घोडा पांढऱ्या रंगाचा का? ज्योतिबाला तो घोडा कुणी दिला? याचा उलगडा मालिकेतून होईल.
ज्योतिबाची भूमिका करणाऱ्या विशाल निकमने या मालिकेसाठी घोडेस्वारीचे खास प्रशिक्षण घेतले आहे. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचे विशालने सांगितले. तो पुढे म्हणतो, या खास दोस्ताशी माझी चांगलीच मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना थोडी जरी चूक झाली तरी तो सांभाळून घेतो. त्याला खाऊ घालणं, त्याच्याशी बोलणं, हे मला खूप आवडतं.

कठपुतळी नृत्याद्वारे संदेश (Message through kathputali Dance)
मनोरंजन आणि प्रबोधन हे टेलिव्हिजन माध्यमाचं मूळ सूत्र असलं तरी मालिकांमध्ये फक्त मनोरंजन दिसून येत आहे. मात्र या सूत्राची कास धरणारा एक प्रसंग ‘फुलाला सुगंध मातीचा’ या स्टार प्रवाह वरील मालिकेत दाखविण्यात आला आहे. या मालिकेत कठपुतळीचे नृत्य नायक-नायिकेने सादर केले असून राजस्थानातील या प्राचीन लोककलेचे प्रदर्शन प्रथमच मराठी मालिकेतून घडविण्यात आले आहे.

सध्याच्या रोगराईच्या माहौलात आपलं घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची फार गरज आहे. पण आपण घर स्वच्छ ठेवतो नि कचरा रस्त्यावरच फेकतो. तेव्हा घराबरोबरच परिसराची स्वच्छता किती महत्त्वाची आहे, ते या नृत्यातून दाखविले आहे. त्यासाठी कठपुतळीच्या बाहुल्यांचे सोंग शुभम्‌ आणि किर्ती या पात्रांनी घेतले. कचरा रस्त्यावर न टाकता कचरापेटीत टाकायला हवा, याचा धडा त्यांनी अनोख्या पद्धतीने दिला आहे.
याबाबत शुभम्‌ची व्यक्तीरेखा साकारणारा हर्षद अतकरी म्हणाला, मराठीत असा प्रयोग आजववर झालेला नाही. हा प्रसंग चित्रित करण्यासाठी कठपुतळी डान्सची जाण असलेले खास नृत्य-दिग्दर्शक बोलावण्यात आले होते.
किर्तीची भूमिका करणारी समृद्धी म्हणते,मला नृत्याची आवड आहे. या निमित्ताने माझी आवड आणि प्रसंग असा सुवर्णयोग जुळून आला. हे चित्रण करताना आम्हाला खूप मजा आली.