‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती अर्थात मधुराणी ...

‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधती अर्थात मधुराणी प्रभुलकरने ब्रेक घेण्याचे खरे कारण काय? (Knows The Reason, Why Madhurani Prabhulkar Has Takes A Break From Serial ‘Aai Kuthe Kay Karte’)

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. मालिकेतील मध्यवर्ती भूमिका साकारणारी अरुंधती सध्या गायनाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेली दाखवली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मालिकेतून थोड्यावेळासाठी ब्रेक घेतला आहे.

मधुराणीने मालिकेतून ब्रेक का घेतला याबद्दलचा खुलासा सुद्धा तिने स्वत: केला. खरेतर मधुराणी प्रभुलकरचा पती प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांची 17 हजारांची फसवणूक झाली आहे. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यामुळे सर्वजण फिरायला जायचा प्लॅन करत आहेत. मधुराणीच्या कुटुंबाने सुद्धा गणपती पुळेला जायचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्यांनी 17 हजार रुपये भरुन ऑनलाइन हॉटेल बुक केले होते. पण तिथे गेल्यावर हॉटेलच्या खात्यात रक्कम जमा झालीच नसल्याचे त्यांना समजले. किंबहुना अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रमोद प्रभुलकर यांनी सांगितले.

मधुराणीने सुद्धा यासंदर्भातील पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की, गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडिया वर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. काल पासून मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ” मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणूक’, अशा बातम्या काही वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत.

पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही. माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच मी मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन . गणपती पुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा. आणि ह्या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत. मला आज सकाळासून शेकडो मेसेजेस व फोन येत आहेत. पत्रकारांनी नीट माहिती न घेता केवळ माझ्या नावाचा वापर करून हेड लाईन छापली आहे. ह्या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध.