महिलांमधील गुडघेदुखी (Know Why Women Are More S...

महिलांमधील गुडघेदुखी (Know Why Women Are More Susceptible To Knee Problems Than Men?)


आपल्या प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पुरुषांपेक्षा महिलांना गुडघ्याचा त्रास जास्त होतो. असे का होते?
मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. आपल्या प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. बदलत्या जीवनशैलीचे जे अनेक तोटे आज माणसाला सोसावे लागत आहेत त्यात गुडघेदुखी सर्वात आघाडीवर आहे. गुडघेदुखी हा आर्थ्रायटिसचा (संधीवाताचा) प्रकार आहे. गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्ध मंडळींनाच होतो असे नाही. आजकाल तरुणींनाही गुडघ्याचा त्रास होऊ लागला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पुरुषांपेक्षा महिलांना गुडघ्याचा त्रास जास्त होतो. असे का होते, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि या दुखण्यापासून आराम कसा मिळवावा हे जाणून घेऊया.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये गुडघेदुखी अधिक असण्याची चार प्रमुख कारणे

 • प्रथम, स्त्रियांच्या शरीराची रचनाच अशी असते की त्यांच्या सांध्याच्या हालचाली अधिक होतात. त्यांचे अस्थिबंधन देखील अधिक लवचिक असतात, त्यामुळे त्या गुडघ्यांची जास्त हालचाल करतात, ज्यामुळे वेदनांचा धोका वाढतो.
 • दुसरे म्हणजे, गुडघे निरोगी ठेवण्यात स्त्री संप्रेरक इस्ट्रोजेन महत्त्वाची भूमिका बजावते. महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान आणि रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे गुडघ्याच्या सांध्याला आधार देणार्‍या कार्टिलेजवर परिणाम होतो.
 • तिसरे, पुरुषांपेक्षा स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो, त्यामुळे गुडघ्यावर दाब आला तरी त्यांचे गुडघे लवकर खराब होतात.
 • चौथे, पुरुषांपेक्षा जास्त वेगाने स्त्रियांची हाडे कमकुवत होतात आणि सांधेदुखी होण्याचा धोका वाढतो.
  खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, प्रदूषण व वाढत चाललेली बैठी जीवनशैली ही प्रमुख कारणे याच्या मुळाशी आहेत. कॉर्पोरेट ऑफिसमधील कामाची जीवनशैली, लिफ्टचा वाढता वापर, कमी अंतरासाठीही मोटारसायकल किंवा मोटार, ऑफिसच्या कँटिनमधील तळलेले मसालेदार पदार्थ वीक एंडचे म्हणजे शुक्रवार-शनिवारच्या रात्रीच्या पार्ट्या, सकाळी उशिरा उठण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव असे सर्वसाधारण दिसून येते. हल्ली तरुणांमध्ये व्यायामाचे प्रमाण वाढले असे मान्य केले तरी त्यात नियमितपणाचा अभाव जाणवतो. जिममध्ये जाण्यासाठी महागडी फी भरतात. पण रात्रीच्या जागरणांमुळे सकाळी व्यायामाला दांडी पडते. ऑफिसला जायला उशीर होण्याचे कारण स्वतःच्याच मनाला देत व्यायाम टाळतात. अशी एक नव्हे तर असंख्य कारणे यामागे आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे पाहूयात.
 • गुडघेदुखीची कारणे
  स्थुलता – महिलांमधील वाढते स्थुलतेचे प्रमाण हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. वाढलेल्या वजनामुळे गुडघ्यांवर भार येऊन त्याचे रुपांतर सांधेदुखीत होते. तुमचे वजन जितके जास्त असेल तितका तुमच्या गुडघ्यांवर पाच वेळा जास्त दबाव येईल. जर तुमचे वजन सामान्यपेक्षा 5 किलो जास्त असेल तर गुडघ्यांवर 25 किलो जास्त दबाव येतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.
  निष्क्रिय जीवनशैली : ज्या महिला शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात, त्यांचे स्नायू कमकुवत आणि कमी लवचिक होतात. जेव्हा गुडघे, नितंब आणि ओटीपोटाच्या आजूबाजूचे स्नायू मजबूत असतात, तेव्हा ते गुडघे स्थिर आणि संतुलित ठेवतात, त्यांना चांगला आधार देतात आणि त्यांच्यावर दबाव येऊ देत नाहीत.
 • दुखण्याकडे दुर्लक्ष करणे : अनेकदा आपण आरोग्याबाबत बेफिकीर असतो, वेदना होत असतानाही आपण त्याचा गांभीर्याने विचार न करता केवळ वेदनाशामक औषध घेऊन तात्पुरती वेळ मारून नेतो. पण गुडघ्यांमध्ये सतत दुखत असेल, सूज येत असेल किंवा त्यांना वळवताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे गुडघ्यांना आणखी नुकसान होऊ शकते. पण आपल्यापैकी बहुतेक जण तेच करतात, ज्यामुळे समस्या आणखी बिकट होते.
  दुखापत : गुडघ्याला दुखापत झाली असेल तर त्यावर त्वरित उपचार करा. वेळेत उपचार न केल्यास भविष्यात वेदना वाढण्याची शक्यता असते. गुडघ्यांचे अस्थिबंधन ताणणे किंवा फाटणे यामुळे देखील गुडघ्यांचा त्रास होऊ शकतो.
 • जास्त व्यायाम करणे: जास्त व्यायाम करणे आणि धावणे यामुळे गुडघ्यांवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे त्यांना नुकसान होण्याचा धोका वाढतो.
  संधिवात : संधिवात शरीराच्या सर्व सांध्यांवर परिणाम करत असला, तरी त्याचा सर्वाधिक परिणाम गुडघ्यांवर होतो, त्यामुळे सांध्यांना सूज येण्याबरोबरच तीव्र वेदना होऊ शकतात. सांधेदुखीच्या बाबतीत शस्त्रक्रिया हाच पर्याय उरतो.
  पोषक तत्वांचा अभाव : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या खाण्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, त्यामुळे आपल्या शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासत आहे. शरीरात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता गुडघे आणि सांधे दुखण्याचे कारण ठरतात.