विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची रोचक प्...

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची रोचक प्रेमकहाणी (Know Vivek Agnihotri And Pallavi Joshi’s Interesting Love Story)

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने देशभरात जणू वावटळ उठली आहे. या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले आहे. विवेक व त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांची प्रेमकहाणी चांगलीच रोचक आहे.

मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी हिला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. बुद्धा इन ए ट्रॅफिक जाम, द ताश्कंद फाइल्स, चॉकलेट अशा चित्रपटांद्वारे नावारूपास आलेल्या विवेक अग्निहोत्रीसोबत तिचा विवाह १९९७ साली झाला. मि. योगी, भारत एक खोज, अल्पविराम अशा टी.व्ही. कार्यक्रमांमधून व छोकरी, सुरज का सातवां घोडा, मेकिंग ऑफ महात्मा अशा चित्रपटांमधून पल्लवीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.

पल्लवी व विवेक यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती.

“आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. आमची पहिली भेट होती. पण दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे, अशी  मला जाणीव त्या भेटीत झाली,” असे विवेकनी एका मुलाखतीत सांगितले.

त्या रॉक कॉन्सर्टची आठवण काढत पल्लवीने सांगितले, “मला खूप तहान लागली होती. अन्‌ विवेकजींनी मला थंड पेय आणून दिले  होते.” विवेक हे जाहिरात क्षेत्राशी संबंधित होते. ते फारच गर्विष्ठ होते. तेव्हा पहिल्या भेटीत मला आवडले नव्हते, असेही पल्लवी सांगते.

नंतर अन्य प्रसंगी दोघे भेटत राहिले. अन्‌ एकमेकांना समजून घेत, त्यांच्यात प्रेमभावना रुजू लागली.

तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी २८ जून १९९७ मध्ये लग्न केले. त्यांना २ मुले आहेत. आता त्यांच्या लग्नाला २५ वर्षे झालीत. दिवसेंदिवस त्यांच्यातील नाते दृढ होत चालले आहे. दोघेही खासगी व व्यावसायिक पातळीवर जोडले गेले आहेत.  अन्‌ एकत्र काम करत राहिल्याने संबंध अधिकच मजबूत होत आहेत, अशी दोघांची भावना आहे.