यामी गौतमचा जीवनसाथी बनलेला आदित्य धर कोण आहे? ...

यामी गौतमचा जीवनसाथी बनलेला आदित्य धर कोण आहे? त्यांचं प्रेम कसं जमलं? (Know About Yami Gautam’s Husband Aditya Dhar : And Their Secret Love Story)

यामी गौतमने शुक्रवारी अचानक आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर प्रसारित करून सगळ्यांना चकित केलं. लेखक-दिग्दर्शक आदित्य धरशी तिने अगदी खासगी समारंभात लग्न लावले. यामी आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, याची खबरबात मीडियाला लागली नव्हती.

यामीचा जीवनसाथी बनलेला आदित्य कोण आहे नि त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात कधी आणि कशी झाली, ते जाणून घेऊया. त्याआधी यामीच्या मेंदी समारंभाचे छान सुंदर फोटोज्‌ पाहूयात – जे तिने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. अन्‌ तिचे चाहते त्याचा आनंद घेत आहेत.

दिल्लीत जन्मलेला आदित्य ३८ वर्षांचा आहे. तो अतिशय गुणी दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा सुपर डुपर हिट चित्रपट आदित्य धरने तयार केला होता. त्याबद्दल सर्वोत्क्‌ष्ट दिग्दर्शक या नात्याने हा आदित्यचा पहिलाच चित्रपट होता. त्यापूर्वी काबूल एक्सप्रेस, तेज, आक्रोश, हाल-ए-दिल या चित्रपटांचा पटकथाकार, संवाद लेखक, गीतकार म्हणून त्याने काम केले आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या पारितोषिक विजेत्या चित्रपटात यामी गौतमने रॉ एजंटची भूमिका केली होती. या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान यामी आणि आदित्यचे प्रेम जुळले असावे. पण या संबंधांची खबर त्यांनी अजिबात लागू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या या लग्नाचे सगळ्यांना आश्चर्य वाटले.

आपल्या लग्नाची शुभवार्ता यामीने सोशल मीडियावरून चाहत्यांना कळविली. लग्नाचा पहिला फोटो प्रसिद्ध करून यामीने लिहिले, ” तुमच्या उजेडामुळे मी प्रेम करायला शिकले. आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज लग्न केलं आहे. मी फारच अंतर्मुख असल्याने आम्ही हा लग्नसमारंभ फक्त आमच्या कुटुंबियांसह साजरा केला. प्रेम आणि मैत्रीचा हा प्रवास सुरु करण्यासाठी आम्हाला, तुमचे प्रेम आणि सदिच्छांची गरज आहे.”