केकेंच्या मृत्युचं गुढ वाढलं, पोलिसांनी दाखल के...

केकेंच्या मृत्युचं गुढ वाढलं, पोलिसांनी दाखल केला अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा (KK Death Mystery: Kolkata Police Registers Unnatural Death Case, Deets Inside)

गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (KK aka Krushnakumar Kunnath) यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. केके यांची मंगळवारी रात्री कोलकातामध्ये लाइव्ह परफॉर्म करताना अचानक तब्बेत बिघडली त्यानंतर त्यांना १०.३० वाजता त्यांना तात्काळ सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र ११.३० च्या सुमारास केके यांच्या निधनाची बातमी समोर आली.

केके यांच्या निधनाने चाहत्यांपासून अगदी बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. एका गायकाने लाइव्ह परफॉर्म करताना मृत्यूला कवटाळणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे. हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय कारण असू शकतात? ​नेमकं कॉन्सर्टमध्ये काय घडलं? अशा चर्चा केल्या जाऊ लागल्या आहेत.

केके यांनी कोलकाताच्या विवेकानंद कॉलेजमध्ये जवळपास दोन तास परफॉर्म केलं. या कार्यक्रमादरम्यान केके यांना प्रचंड घाम येत होता. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान असं होऊ शकतं. मात्र कार्यक्रमानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तात्काळ हॉटेलमध्ये नेलं.

कार्यक्रमानंतर केके हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना उल्टी झाल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांनतर त्यांना लगेच मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट नेण्यात आलं. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. परंतु जसजसे कॉन्सर्टचे व्हिडिओज पाहिले गेले त्यावेळेस केके यांच्या डोक्यावर आणि ओठांवर जखमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची शंका आली अन्‌ त्यांनी तसा गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष तेथे उपस्थित असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे की जेथे केके यांचा हा कॉन्सर्ट सुरू होता तेथील आयोजकांनी नीट व्यवस्था केली नसल्याने ही घटना घडली. अडीच ते तीन हजार लोकांची क्षमता असणाऱ्या ऑडिटॉरियममध्ये पाच ते सात हजार लोक उपस्थित होते. त्यामुळे एका व्हिडिओमध्ये त्या बंद ऑडिटॉरियममधील गोंधळ दिसून येत आहे. या जमावाला पांगवण्यासाठी तेथे अश्रु धुराचा (फायर इक्स्टिंग्विशरचा) प्रयोगही केला गेला. तरीही चाहते दरवाजा तोडून, भिंतीवरून तेथे पोहोचले होते.

असंही सांगितलं जात आहे की गर्दीमुळे तर अस्वस्थता होतीच शिवाय तेथील एसीही काम करत नव्हता, ज्याबाबत केकेंनी आधीच तक्रार केली होती. परफॉर्म करतानाही केके अनेकदा घाम पुसताना दिसत आहे. तसेच ते खूप गर्मी आहे असंही सांगत होते. असे असूनही आयोजकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने तर असे सांगितले की, बंद सभागृहात पैसे घेऊन म्हणजे तिकीट घेऊन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं, असं असतानाही एवढी गर्दी कशी जमू दिली? तसेच, जर धूर सोडला गेला असेल आणि त्याचा गॅस एसीमधून आत गेला असेल, तर तो विषारी सिद्ध होऊ शकतो.

एवढ्या मोठ्या कॉन्सर्टसाठी खरंतर अॅम्ब्युलन्सपासून फायर ब्रिगेडपर्यंतची व्यवस्था आवश्यक असल्याचा आरोपही चाहते करत आहेत, जर ही व्यवस्था करण्यात आली असती तर केके वाचू शकले असते कारण त्यांना वेळीच हॉस्पिटल किंवा प्राथमिक उपचार मिळाले असते आणि आज ते आपल्यात असते.

दुखापतीबद्दल बोलायचं तर, केके अडखळले आणि पडले, त्यामुळे या दुखापतीच्या खुणा आल्या असतील. शोदरम्यान जेव्हा केकेंची तब्येत बिघडत होती, त्यांचा आवाजही क्षीण होत होता, शिवाय त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते तेव्हा त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाण्याऐवजी थेट हॉस्पिटलमध्ये का नेण्यात आले नाही? हे आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्यावरून गायकाचा मृत्यू गैरव्यवस्थापनामुळे तर झाला नाही ना? अशा शंका उपस्थित होत आहेत.

केके यांच्या मृत्यूचे खरे कारण कळण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या परवानगीने पोस्टमार्टेम करावं लागेल, असं म्हटलं जात आहे.

बंगाल भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थित आयोजन केलं गेलं नाही, तेव्हा त्याची चौकशी करावयास सांगितले आहे. केके यांनी अस्वस्थ अवस्थेतही एका तासाभरात २० गाणी गायली आणि शेवटच्या गाण्याच्या वेळेस अस्वस्थता वाढल्याने ते स्टेज सोडून बाहेर पडले.

हॉटेलच्या बाहेरही चाहत्यांची गर्दी जमली होती. त्यांना आपल्या लाडक्या गायकासोबत सेल्फी काढायची होती. परंतु त्यांनी हे सर्व करण्यास नकार दिला आणि लॉबी सोडून ते रुममध्ये गेले. तेथे जाताच ते कोसळले. तेथून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु तेथे पोहचताच डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. आता पोलीस सीसी टीव्ही फुटेज पाहून कॉन्सर्ट पासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत मध्ये काय काय झाले त्याबाबत चौकशी करत आहेत. सुरुवातीला हा हृदयविकाराचा झटका वाटला तरी त्यांच्या मृत्यूचं गुढ पोस्टमार्टमच्या अहवालानंतरच उकलेल.