‘मला हिरोबरोबर शय्यासोबत करायला सांगितले ...

‘मला हिरोबरोबर शय्यासोबत करायला सांगितले होते’ – बॉलिवूडच्या कास्टींग काऊच बाबत किश्वर मर्चंटचा गौप्यस्फोट (Kishwer Merchant On Casting Couch In Bollywood; ‘I Was Asked To Sleep With The Hero’)

कास्टींग काऊच अर्थात्‌ काम देण्याच्या मोबदल्यात तरुणींना शय्यासोबत करायला लावणं, ही बाब म्हणजे बॉलिवूडच्या पाचवीला पुजल्यासारखी झाली आहे. याबाबत आता बऱ्याच तरुणी उघडपणे खुलासा करू लागल्या आहेत. असाच एक घाणेरडा अनुभव टी. व्ही. स्टार किश्वर मर्चंटने इ टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कथन केला आहे. किश्वरने सांगितले की, या संदर्भात ती बोलणी करायला गेली होती. सोबत तिची आई होती. सिनेमात काम मिळावे असे वाटत असेल, तर तुला या सिनेमाच्या हिरो बरोबर शय्यासोबत करावी लागेल, असं मला सांगण्यात आलं.

मी विनम्रपणे ही ऑफर धुडकावली. अशी ऑफर ज्याच्यासाठी देण्यात आली, तो कोण होता? असं किश्वरला विचारताच तिने नाव सांगण्यास नकार दिला. तो मोठा नाववाला हिरो आहे, एवढंच तिनं सांगितलं.

सिनेमात काम करण्याबाबत, ती म्हणाली की, मी टी. व्ही. क्षेत्रात खुश आहे. इथे चांगलं काम मिळतं. नावही होतं. टी. व्ही. माध्यमाद्वारे तुम्ही जास्त लोकांसमोर जाता. सिनेमात लहानसहान भूमिका करण्यापेक्षा टी.व्ही. वर चांगलं काम केलेलं बरं.

हा वाईट अनुभव मला एकदाच आला. असं सांगून किश्वर म्हणते की, बॉलिवूडमध्ये हे सर्रास चालते, असं मी म्हणणार नाही. कारण सर्वच क्षेत्रात ते चालते. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर इथे मी नायिकेच्या भूमिकेसाठी आलेच नव्हते. कारण माझा चेहरा व नृत्याबाबतच्या मर्यादा मी जाणून आहे. नायिकेच्या लायकीचा माझा चेहरा नाही की मला इतकं चांगलं नाचताही येत नाही. शिवाय बोल्ड कपडे किंवा बिकिनी घालणं मला जमणार नाही. टी.व्ही. वर सोज्वळ भूमिका असतात. त्या मला जमतात.

लग्नानंतर मी थोडेफार बोल्ड कपडे घालतेय्‌, अशी कबुली किश्वरने दिली. पण ते स्क्रीनवर नाही. किश्वर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय आहे. आता ती आई होणार आहे. आपल्या गर्भारपणाच्या लूक्सबाबत ती प्रसिद्ध झाली आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात किश्वर आणि सुयश आपल्या बाळाचे स्वागत करतील. लग्नानंतर सहा वर्षांनी, आपल्या वयाच्या चाळिशीत किश्वर आई होणार आहे. ती सुयशपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. या दोघांची जोडी खूप छान जमली आहे. बिग बॉसमध्ये लोकांनी त्याची झलक पाहिली आहे.