सुपरिचित अभिनेता आणि केतकी दवेचा पती रसिक दवे य...

सुपरिचित अभिनेता आणि केतकी दवेचा पती रसिक दवे यांचे निधन (Ketki Dave’s Husband Rasik Dave Passes Away At 65)

लोकप्रिय टीवी शो ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्री केतकी दवे यांचे पती आणि सुपरिचित गुजराती अभिनेता रसिक दवे यांचे किडनी निकामी झाल्याच्या कारणाने निधन झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून ते डायलिसिस वर होते.

गुजराती आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने दर्शकांचे मन जिंकणारे अभिनेता रसिक दवे यांचे काल रात्री निधन झाले आहे. ते टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांचे पती होते. किडनी निकामी झाल्याकारणाने ६५ वर्षीय रसिक दवे यांचे निधन झाले आहे.

अभिनेता रसिक दवे हे गेल्या दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत होते. परंतु त्यांच्या तब्येतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यांना डायलिसिसवर ठेवले होते. एक महिन्यापासून त्यांची किडनी दिवसेंदिवस खराब होत होती आणि त्यांना फारच त्रास होत होता. गेले १५ दिवस ते रुग्णालयात ॲडमिट होते परंतु, काल त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  

रसिक दवे यांनी १९८२ मध्ये पुत्र वधु या गुजराती चित्रपटापासून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. त्यांची पत्नी केतकी दवे या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. उभयतांना रिद्धी आणि अभिषेक अशी दोन मुलं आहेत. रसिक दवे आणि केतकी दवे यांनी गुजराती थिअेटर कंपनी सुरू केली होती. या जोडप्याने २००६ मध्ये रियॅलिटी शो नच बलिए मध्येही भाग घेतला होता. रसिक दवे यांनी ‘संस्कार- धरोहर अपनों की’, ‘सीआईडी’, ‘कृष्णा’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीवी मालिकांमध्ये काम केले आहे.