सहज करण्याजोगे व्यायाम (Keep Fit With Simple Ex...

सहज करण्याजोगे व्यायाम (Keep Fit With Simple Exercises)

सध्याच्या धावपळीच्या युगात काम जास्त आणि आराम कमी, अशी परिस्थिती आहे. निश्‍चितच याचा आरोग्यावर परिणाम होत आहे, तेव्हा या परिस्थितीतही निरोगी राहायचं असेल, तर व्यायाम करणं गरजेचं आहे.
पहाटे डोक्यापासून पायापर्यंत दुलई ओढून झोपलं की छान उबदार झोप लागते. अशा वेळी साखरझोपेतून उठून मस्त वातावरणामध्ये चालावयास जावं, धावण्यास जावं, बायकिंग वा हाइकला जावं असं किती जरी ठरवलं तरी झोपेपुढे सर्व काही निष्क्रिय ठरतं. सध्याच्या धावपळीच्या दिवसांत व्यक्तींची किमान 6 तासांची झोपही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे कामाचे तास वाढलेत आणि आरामाचे कमी. त्यामुळे व्यायाम करायचा अगदी संकल्प केला तरीही त्याचं पालन होत नाही किंवा त्यात नियमितपणा राहत नाही. परंतु निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणं हे प्रत्येकासाठीच गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढणंही गरजेचं आहे. इच्छा तिथे मार्ग. तेव्हा बाहेर न पडता घरीच अगदी सहज करता येणारे व्यायाम करा.

दोरी उड्या
दोरीच्या उड्या मारणं हा केवळ लहान मुलींसाठीचा व्यायाम नाही. घरीच दोरीच्या उड्या मारण्याचा सराव केल्यास सोपा आणि आवडीचा व्यायाम घडतो. सर्वांगाला व्यायाम होतो.

स्टेप अप्स
स्टेप म्हणजे पायरी. घरात आपण पाटासारखं एखादं लहान टेबल समोर ठेवून त्यावर सायकलप्रमाणे पाय वर-खाली केल्यास हा वेगळा आणि सहज करता येण्याजोगा व्यायाम आहे. यामुळे सांधेदुखी बंद होते.

लंग्स
हा व्यायाम करताना प्रथम उजवा पाय पुढे व डावा पाय मागे करून पुढचा पाय गुडघ्यात दुमडून मागचं ढोपर जमिनीवर टेकवायचं. (म्हणजे मागच्या पायावर बसल्यासारखं करायचं) नंतर डावा पाय पुढे घेऊन तशीच क्रिया करायची. या व्यायामाच्या नियमितपणामुळे कोणतंही दुखणं राहत नाही.

जम्पिंग जॅक
हा व्यायाम तुम्ही कधीही व केव्हाही करू शकता. सरळ उभं राहून पाय फाकवून त्याच वेळेस उडी मारता मारता दोन्ही हात वर न्यायचे. हाताने टाळी वाजली तरी चालेल व पुन्हा हात खाली. ही क्रिया सातत्यानं करावी लागते. टी.व्ही.वरील कार्यक्रम पाहत असताना जाहिरातीच्या ब्रेकमध्येही हा व्यायाम करता येतो.

डान्सिंग
हा सगळ्यांच्या आवडीचा व आनंदाने केला जाणारा व्यायाम आहे. आपल्या आवडत्या संगीताच्या ठेक्यावर तालबद्ध स्टेप्स करत नाचायचं. हा उत्तम व्यायाम आहे. यामुळे शरीर, मन आणि मेंदूही प्रसन्न होतो. हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही वेळेची अडचण येत नाही.

स्वच्छतेची कामं
तुम्हाला आश्‍चर्य वाटेल, परंतु आपण घरामध्ये जी स्वच्छतेची कामं करतो त्यामुळेही आपला बराच व्यायाम होतो. फरशी पुसणं, केर काढणं, व्हॅक्युम क्लीनरनं घरातील जळमटं साफ करणं हे सगळं करताना आपल्या हातापायांच्या तसेच मानेच्या बर्‍याच हालचाली होतात व त्यामुळे आपल्याला व्यायाम घडतो नि घरही स्वच्छ होतं.

मग आळस झटकून व्यायामाला लागणार ना? 

आणखी वाचाकॅन्सरच्या या १८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष