प्रसिद्ध कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराजांचे नि...

प्रसिद्ध कथ्थक सम्राट पंडित बिरजू महाराजांचे निधन (Kathak Maestro Pandit Birju Maharaj Passes Away)

प्रसिद्ध कथ्थक कलाकार पंडित बिरजू महाराज यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. बिरजू महाराज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.

‘त्यांच्या जाण्याने आज भारतीय संगीताची लय थांबली आहे. सूर मौन झाले आहेत. भाव शून्य झाले आहेत. कथ्थकचे राजे पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे,’ अशी श्रद्धांजली मालिनी अवस्थी यांनी त्यांना वाहिली आहे. तर’आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे,’ असे अदनान सामीने म्हटले आहे.

लखनऊच्या कथ्थक कुटुंबात जन्मलेल्या बिरजू महाराजांचे वडील आच्छान महाराज आणि काका शंभू महाराज यांचे नाव देशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होते. त्यांचे मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३७ साली झाला. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी लवकरच त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी काकांकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली.

१९८३ साली पंडित बिरजू महाराज यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही देण्यात आला आहे. याशिवाय बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट पदवी दिली होती.

बिरजू महाराज यांनी देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी संगीत दिले होते. ‘विश्वरूपम’ चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना २०१२ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचवेळी, २०१६ मध्ये त्यांना ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिरजू महाराज यांच्या निधनानंतर अनेक मोठ्या हस्तींनी दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ओम शांती!